आपल्या कडक शिस्तीसाठी आणि तडजोड न करणाऱ्या कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी आयएएस (IAS) तुकाराम मुंढे यांनी 25 मे 2026 रोजी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार हाती घेताच त्यांनी नेहमीच्या ‘सिंगम’ स्टाईलने काम सुरू केले असून, अवघ्या काही दिवसांतच राज्यातील भेसळखोर, बेकायदेशीर गुटखा विक्रेते आणि फसव्या जाहिराती करणाऱ्या ब्रँड्सचे धाबे दणाणले आहेत. “सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारांची गय केली जाणार नाही,” असा इशारा देत मुंढेंनी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. नेमकं आतापर्यंत मुंढेंनी कारवाई करत कुणा-कुणाचे धाबे दणाणून सोडले त्याबद्दल जाणून घेऊया..
तीन दिवसांत 53 ठिकाणी छापे, 33 जणांना अटक
पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या तीन दिवसांतच म्हणजेच 25 मे ते 27 मे 2026 रोजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी राज्यभरात 53 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 27 ते 28 बेकायदेशीर आस्थापना व दुकाने तात्काळ सील करण्यात आली आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि आरोग्याला घातक ठरणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या 33 आरोपींना अटक करण्यात आली असून, 25 हून अधिक एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहेत.
20 लाखांपेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित गुटखा व मुद्देमाल जप्त
मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा सर्वच विभागांमध्ये ही मोहीम एकाच वेळी राबवण्यात आली. राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर सर्वाधिक जरब बसवण्यात आली. या संपूर्ण कारवाईत तब्बल 20 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाया बृहन्मुंबई (19 दुकाने सील) आणि कोकण विभागात (10 दुकाने सील) झाल्या आहेत.
‘पतंजली’सह आयुर्वेदिक औषधांच्या केंद्रांवर कारवाई, 73 लाखांचा साठा जप्त
केवळ खाद्यपदार्थच नव्हे, तर औषध क्षेत्रात चालणाऱ्या गैरप्रकारांनाही मुंढेंनी टार्गेट केले आहे. आजारांचे अवास्तव दावे करून किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करून औषध विक्री करणाऱ्या केंद्रांवर एफडीएने मोठी कारवाई केली. यामध्ये बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ समूहाशी संबंधित उत्पादनांसह विविध ठिकाणांहून तब्बल 73 लाख 24 हजार रुपयांचा संशयास्पद व फसव्या जाहिरातींच्या निकषात येणारा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. ‘मिरेकल क्युअर’ चे दावे करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे.
रासायनिक आंबे, दूध भेसळ आणि विषारी दारूचे कनेक्शन
– दूध भेसळ रॅकेट (जळगाव) : गाईच्या दुधात खाद्यतेल आणि इतर रासायनिक पदार्थ मिसळणारे मोठे रॅकेट जळगावमध्ये उघडकीस आणले.
– कृत्रिम आंबे (इंदापूर, पुणे) : रसायनांचा वापर करून आंबे पिकवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत हजारो रुपयांचा साठा नष्ट करण्यात आला.
– विषारी दारूचे कनेक्शन (भिवंडी): पिंपरी-चिंचवडमधील एका दारूकांडाचे कनेक्शन शोधत एफडीएने भिवंडीतील ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ कंपनीवर छापा टाकला आणि तिथे साठवून ठेवलेला तब्बल 5,929 किलो मिथेनॉलचा साठा जप्त करून मोठी दुर्घटना टळली.
– गोरस भंडार (वर्धा): वर्ध्यातील प्रसिद्ध ‘गोरस भंडार’वर छापा टाकून तब्बल 25.86 लाखांचे दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आणि ती आस्थापना सील करण्यात आली.
आता मुंढेंच्या रडारवर ‘सेलिब्रिटी’
तुकाराम मुंढेंनी केवळ उत्पादकांवरच नाही, तर टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये अवास्तव दावे करणाऱ्या जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या मोठ्या स्टार्स आणि सेलिब्रिटींनाही थेट इशारा दिला आहे. एखादा मोठा ब्रँड किंवा सेलिब्रिटी ग्राहकांची दिशाभूल करत असेल, तर त्या ब्रँड ॲम्बेसेडरचीही जबाबदारी निश्चित केली जाईल आणि त्यांच्यावरही थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एफडीए प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडल्यानंतर मुंढेंच्या रडारवर फसव्या जाहीराती करणारे सेलिब्रिटी असणार आहेत.
