सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पावडरची चोरटी वाहतूक बीडच्या आष्टी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बोलेरो पिकअप वाहनासह एकूण 72 गोणी व्हे पावडर जप्त केली. या साठ्याची किंमत ₹2 लाख 69 हजार 700 रुपये असून, या प्रकरणामुळे आष्टी-जामखेड परिसरातील दूध भेसळीच्या प्रकारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे आष्टी-जामगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन्ससमोर संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (MH 13 CU 4141) अडवून त्याची तपासणी करण्यात आली. वाहनात व्हे पावडरच्या 47 गोण्या आढळल्या. चालकाची चौकशी केल्यानंतर यापूर्वी आणखी 25 गोण्या आष्टीतील हर्षद हॉटेलसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये उतरवल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने तेथेही कारवाई करून दोन्ही ठिकाणांहून एकूण 72 गोण्या जप्त केल्या. या पावडरच्या वाहतुकीसंदर्भात परवाना, खरेदी-विक्रीची बिले किंवा वाहतूक चलान यांसारखी कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळली नाहीत.
या कारवाईनंतर वाहनचालक सुशांत ऊर्फ बाबू लक्ष्मण गोपाळघरे (वय 20, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड) याच्यासह मालाचा मालक हरिदास एकनाथ गोपाळघरे आणि माल स्वीकारणारा कैलास हंबर्डे (रा. आष्टी) अशा तीन जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापैकी बाबू गोपाळघरे याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य दोन आरोपी फरार असल्याची माहिती आहे.
जप्त करण्यात आलेला साठा कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरला जाणार होता का, तसेच या पावडरचा पुरवठा कोणत्या दूध संकलन केंद्रांना किंवा डेअऱ्यांना केला जाणार होता, याचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीच्या जामखेड येथील मे. भगवान कृपा दूध संकलन केंद्रावरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्रीकांत करकळे आणि सहाय्यक आयुक्त नि. दी. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाढे आणि आष्टी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून, या साखळीतील उत्पादक, पुरवठादार आणि खरेदीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
