Teacher Set Recognition : शिक्षक संच मान्यतेमुळे राज्यभरात हजारो शिक्षकांमध्ये अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. सुधारित संचमान्यता निकषाला महाराष्ट्र राज्य शिक्षक (Teacher) परिषद प्राथमिक विभागाने विरोध केला आहे. ग्रामीण भागात कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट या माध्यमातून घातला जात असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे.
संच मान्यता जुन्या निकषानुसार करण्याची मागणी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे. प्राथमिक शाळांची संच मान्यता सध्या सुधारित निकषानुसार सुरू आहे. या संच मान्यतेमध्ये १५ मार्च २०२४च्या निर्णयानुसार झालेल्या बदलाच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. यामध्ये एखाद्या शाळेत इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग मिळून २० पेक्षा कमी पटसंख्या असेल तर एकही शिक्षक मान्य होत नाही.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ
परिणामी, अनेक पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. तसेच पूर्वी विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकसंख्या निर्धारित केली जात असे. नव्या निकषानुसार, विद्यार्थी संख्या वाढवण्यात आली आहे. परिणामी, अनेक शाळांना अपेक्षेपेक्षा कमी शिक्षक उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संच मान्यता सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. यात विद्यार्थी संख्येनुसार, काही बदल करण्यात आले आहेत. नवीन निर्णयानुसार पहिली ते पाचवीपर्यंत एक ते २० पटाच्या शाळांकरिता किमान एक शिक्षक व नंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार विद्यार्थी संख्या उपलब्ध झाल्यास सेवानिवृत्त शिक्षक देण्यात येणार आहे. २० ते ६० विद्यार्थी संख्या पटसंख्या असल्यास दोन शिक्षक मिळणार आहेत.
६१ ते ९० पटसंख्या असल्यास तीन शिक्षक मिळणार आहेत; मात्र राज्य सरकारच्या आधीच्या निर्णयानुसार ६१ पटसंख्या झाल्यास तिसरा शिक्षक उपलब्ध होत असे; मात्र आताही विद्यार्थी संख्या किमान ७६ झाल्याशिवाय तिसरा शिक्षक मिळणार नाही. याच निकषानुसार सध्या संच मान्यतेबाबत ऑनलाइन कार्यवाही होत असताना २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शून्य शिक्षक दाखविण्यात येत आहेत.