उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांच्याकडून संयुक्त वचननामा प्रसिद्ध; वाचा, A टू Z घोषणा

शिवसेना भवनात युतीच्या उमेदवारांसाठी आयोजित कार्यशाळेत त्यांनी मुंबईच्या विकास आणि कल्याणाबाबत सविस्तर सादरीकरण केले होते.

News Photo   2026 01 04T184533.428

उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांच्याकडून संयुक्त वचननामा प्रसिद्ध; वाचा, A टू Z घोषणा

मुंबई महापालिकेची निवडणूक जोरदारर सुरू आहे. प्रचारही रंगात येताना दिसत आहे. (Thackeray) अनेक दिवसांनंतर ही निवडणूक होत आहे. यावेळी या निवडणुकीकडं वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे. कारण, दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र लढत आहेत. आज रविवार (दि. 4 जानेवारी)रोजी मुंबईतील शिवसेना भवताना शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने आपला संयुक्त वचननामा ‘शिवशक्ती’ नावाने जाहीर केला.

या कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात आले होते. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीने या जाहीरनाम्यात स्वस्त घरं उपलब्ध करून देणं, आरोग्य सेवा, सार्वजनिक वाहतूक आणि शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे आश्वासन दिलं आहे. याशिवाय, ७०० चौरस फूटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्याचं, तसंच पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक सदनिकेला एक पार्किंग जागा देण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे.

मुंबई मनपासाठी ज्युनिअर ठाकरे बंधूं मैदानात, जाहीरनामा जाहीर, वाचा काय आहेत योजना?

हा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध होण्याच्या काही दिवस आधीच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या भविष्यासंदर्भातील आपली दृष्टी मांडली होती. शिवसेना भवनात युतीच्या उमेदवारांसाठी आयोजित कार्यशाळेत त्यांनी मुंबईच्या विकास आणि कल्याणाबाबत सविस्तर सादरीकरण केले होते. स्वच्छतेच्या दृष्टीने, मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर दोन किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे.

‘बेस्ट विद्युत’ या योजनेअंतर्गत घरगुती वीज वापरणाऱ्या नागरिकांना दरमहा १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, ‘शब्द ठाकरेंचा’ या वचननाम्यात मुंबईकरांसाठी अनेक गोष्टींची घोषणा करण्यात आली असून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. या वचननाम्यावर कोणाकडून काही प्रतिक्रिया येतात का, ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वचननाम्यातील आश्वासने खालीलप्रमाणे

मुंबईकरांचा स्वाभिमान

घरकाम करणा-या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला रू.१,५०० स्वाभिमान निधी देणार.

कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांना अर्थसाह्य आणि नवीन परवान्यांची तरतूद-ज्यात समुदायांतर्गत परवान्यांच्या हस्तांतरणाची सोय समाविष्ट असेल.

कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी मासाहेब किचन्स सुरू करणार.

मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर २ किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालयं बांधणार. या स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन पॅड व्हेंडिंग मशिन्स असतील. लहान मुलांचे डायपर्स बदलण्याची सोय असेल.

पाळणाघरे

नोकरदार पालक तसंच कष्टकरी महिला यांच्या लहानग्यांना सांभाळणारी पाळणाघरे सुरू करणार.

पाळीव प्राणी

मुंबईच्या प्रत्येक विभागात पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट क्रेश, पेट एम्ब्यूलन्स, पेट क्रेमॅटोरियम यांची सोय उपलब्ध करून देणार.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना

एक लाख तरुण-तरूणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी आणि २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार.

रोजगार

मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदं भरणार.

महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑन-साइट अॅप्रेंटिसशीप देऊन मराठी तरूण-तरूणींना कामाचा अनुभव देणार.

मुंबईत रोजगारासाठी येऊ इच्छिणाऱ्या मराठी तरुण-तरुणींसाठी वसतिगृह उभारणार.

महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात यूपीएससी आणि एमपीएसीच्या विद्यार्थ्यांसाठी सी. डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करणार.

मैदाने

छत्रपती शिवाजी महाराज पार्कसारखी चांगली मैदानं, उद्यानं उभी केली जातील. जिथे नागरिकांना बसण्यासाठी कट्टे असतील. ती मैदानं भिंतींनी झाकली जाणार नाहीत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असतील तसंच प्रत्येक वार्डात एक आजोबा-आजी उद्यान असेल.

शिक्षण

महापालिकेच्या शाळा कदापी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही.

दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणार.

मुंबई महापालिकेच्या शाळांचा संपूर्ण कायापालट करण्यात शिवसेनेला गेल्या १० वर्षांमध्ये यश आलेलं आहे. ज्या शाळांकडे पाहून काही लोक नाकं मुरडत होते, त्या महापालिका शाळांचा उंचावलेला शैक्षणिक दर्जा, दहावीचा उत्तम निकाल आणि एसएससी बोर्ड, आयसीएसई बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयबी बोर्ड आदी अभ्यासक्रमांमुळे पालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यायला अक्षरशः रांगा लागत आहेत.

मुंबईतल्या महागड्या, खासगी शाळांप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या ‘पब्लिक स्कूल्स’ या आता उत्तम, गुणवत्तापूर्ण, अत्याधुनिक शिक्षणासाठी ओळखल्या जातात.

प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची मातृभाषा, राजभाषा मराठी आणि जागतिक भाषा इंग्रजी यायलाच हवी हा आमचा आग्रह आहे. मुंबई महापालिका ही देशातील एकमेव महापालिका असेल जी मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, तेलगू, तामिळ, कन्नड आणि इंग्रजी या आठ माध्यमांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत उपलब्ध करून देते.

शिक्षण अनुभव सहज, सुंदर आणि प्रभावी व्हावा यासाठी इयत्ता आठवीपुढील प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देणार.

प्रत्येक शाळेत व्हर्चुअल आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी तसंच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचावापर करुन विद्यार्थ्यांना नव्या जगातील नव्या शैक्षणिक आव्हानांसाठी सज्ज करणार.

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा फिटनेस आणि पोषक (शाकाहारी व मांसाहारी-अंडे) आहारावरही विशेष लक्ष देणार.

महापालिकेच्या सर्व माध्यमांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘बोलतो मराठी’ हा हसत-खेळत मराठी शिकवणारा डिजिटल उपक्रम सुरु करणार.

मुंबई महापालिकेची वाचनालयं ही अत्याधुनिक आणि डिजिटल केली जातील. आणि प्रत्येक वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल.

मुंबईची अनुभूती

मुंबईचं ‘मुंबईपण’ अधोरेखित करण्यासाठी एस्थेटिक सेन्स पाळला जाईल आणि मुंबईच कॅरेक्टर जपलं जाईल.

मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करणार.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित करणारे स्वातंत्र्यसमर स्मृतीदालन उभारणार.

सात बेटं ते देशाची आर्थिक राजधानी हा गेल्या तीनशे-साडेतीनशे वर्षातील मुंबईच्या प्रगतीचा ऐतिहासिक आढावा, कापड गिरण्या ते आयटी हब हा प्रवास तसंच मुंबईला घडवण्यात मोलाचा वाटा असलेल्या उद्योजकांच्या योगदानाचे दर्शन घडवणारे अत्याधुनिक मुंबई म्युझियम उभारणार.

स्व. बाळासाहेबांच्या नावाने मुंबईत एक कला महाविद्यालय सुरु केलं जाईल. जिथे उपयोजित कला, फाईन आर्ट्स, सिनेमा तंत्र यांचं शिक्षण मिळेल

मुंबई महापालिका २०३१ पर्यंत १० नवीन मध्यम व छोट्या आकाराची नाट्यगृहं व कलादालने उभारेल.

मुंबईसाठीची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा

मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कंट्रोल रूम यांचे आधुनिकीकरण करून प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी जलद दले (रॅपिड फ्लीट) सज्ज ठेवणार.

मुंबईतल्या उंचच उंच इमारती आणि झोपडपट्टी परीसरातील आव्हाने लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करणार. प्रत्येक वॉर्डात मिनी फायर ब्रिगेड आणि फायर फायटिंग मोटरसायकल्स उपलब्ध असतील.

हॅझमॅट रिस्पॉन्स वेहिकल आणि ऑल टेरेन ऑल पर्पज वेहिकल उपलब्ध करणार.

आरोग्य

प्राथमिक आरोग्य सेवाच नव्हेत, तर सर्व प्रकारच्या, अगदी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवता याव्यात यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेली तीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्वसाधारण रूग्णालये यांनंतर विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय येथे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.

दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबईतील रूग्णांचा भार समर्थपणे पेलण्यासाठी आणि आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी मुंबईत आणखी पाच वैद्यकीय महाविद्यालयं (शताब्दी-गोवंडी, शताब्दी-कांदिवली, एम.टी. अग्रवाल-मुलुंड, भगवती- बोरिवली, राजावाडी-घाटकोपर येथे) सुरू करणार.

पालिका रूग्णालयांतील ओपीडी क्षमता दुप्पट करणार.

महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे रोबोटिक ऑपरेशन थिएटर तसंच डिजिटल सब्स्ट्रॅक्शन एंजिओग्राफी / जलद रिकव्हरीसाठी लॅप्रोस्कोपी सर्जरी सुरु करणार.

शताब्दी (कांदिवली), एमटी अग्रवाल (मुलुंड) आणि शताब्दी (गोवंडी) रुग्णालयांचे खासगीकरण होऊ देणार नाही.

केंद्र व राज्य सरकार मान्यताप्राप्त जेनेरिक मेडिसिन दुकानांमध्ये पालिका रुग्णालयातील तसंच दवाखान्यातील डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शन दिलेल्या रुग्णांना जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करुन देणार.

ज्येष्ठ नागरिकांसाठी २४x७ हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि आरोग्यसेवा आपल्या दारी (हेल्थ-टू-होम) या सेवा सुरू करणार.

महापालिका स्वतःच्या मालकीची रूग्णवाहिका आणि शववाहिनी सेवा सुरू करणार.

मुंबई महापालिकेचं स्वतःचं सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय असेल.

Exit mobile version