गेल्या 10 वर्षांमध्ये 21 हजार कोटी खर्च अन् 3 कोटीचा भ्रष्टाचार, साटम यांचा ठाकरेंवर आरोप
मुंबई शहरात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये 21 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.
राज्यात महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. (Election) निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकूण 29 महानगरपालिकांची निवडणूक होत आहे. या एकूण महापालिकांमध्ये मुंबई महानगरपालिका चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, ठाकरे गट, शिंदे गटाने पूर्ण तकाद लावली आहे. प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येत आहे, तसे-तसे प्रचाराला वेग येत आहे.
विशेष म्हणजे नेतेमंडळी आपल्या भाषणावेळी विरोधकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांना लक्ष्य केले होते. साटम यांना ठाकरे चाटम म्हणाले होते. आता याच अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांनी तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप साटम यांनी केला आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंना धक्का, माजी महापौरांचा राजीनामा
अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ठाकरेंनी साटम यांचा उल्लेख चाटम असा केला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली. त्यांनी प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. मी सामान्य कुटूंबातून आलेलो आहे. कोणाच्या आशीर्वादाने आलो नाही, असा टोला साटम यांनी लगावला. तसंच, पुढे बोलताना ठाकरेंनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप साटम यांनी केला.
मुंबई शहरात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये 21 हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्याची अवस्था बिकट आहे. हे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाले आहे. कोरोना काळात महालक्ष्मी येथील कोव्हिड सेंटर हे बिल्डरच्या भल्यासाठीच उभारण्यात आले होते. बॉडी बॅग, पीपीई कीट असं काहीही त्यांनी सोडलं नाही, असा आरोप साटम यांनी केला.
तसंच, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी 1700 बार रेस्टॉरंटकडून वसुली केली. ते कोस्टल रोड आम्ही केला, असे म्हणत आहेत. परंतु त्यांच्या काळात हा रोड तयार करण्यासाठी तारखा ठरत नव्हत्या. कोस्टल रोडचं सगळं श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे, असा दावा करत साटम यांनी उद्धव ठाकरे यांनी 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा असा गंभीर आरोप केला. त्यामुळे आता अमित साटम यांच्या आरोपांना ठाकरे गट कसे उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
