मुंबई : प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. पण प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता, कोणाचे ऐकायचे नाही, मनाचे करायचे चालले होते, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस (Congress) सोडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. लोकमत या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करताना ही टीका केली. (Former Chief Minister Ashok Chavan strongly criticized the administration of State President Nana Patole after leaving the Congress.)
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. त्यांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्येही हा राजकीय भूकंप झाला आहे. अशोक चव्हाण हे आजच भाजपात प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या या भुमिकेमागे त्यांचा प्रदेशाध्यक्षांवर असलेला रागच कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता, कोणाचे ऐकायचे नाही, मनाचे करायचे असे चालले होते. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती. पक्ष जिंकावा यासाठीचे कोणतेही नियोजन होत नव्हते. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. लोकसभेची लढाई आपण जिंकणार कशी, असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला होता. त्या दृष्टीने चर्चा, अंमलबजावणी होत नव्हती. राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हते.
आताची वेळ ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची, लोकांचे प्रश्न तडीस लावण्याची असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण वगैरे चालले होते. या सगळ्या कार्यशैलीबद्दल मी बोललो, सूचना केल्या पण त्यांची दखल घेतली गेली नाही. शेवटी किती वाट पहायची? टीमवर्क दिसत नव्हते. पक्षात काही बदल घडवून आणण्यासाठी खूप उशीर झालेला होता, सांगून अर्थ नाही असे मला वाटले. काही चांगले बदलच दिसत नव्हते. साचेबद्धपणा आलेला होता. किती वर्षे अशीच वाट पाहायची? किती कोंडी होऊ द्यायची?
धर्मनिरपेक्ष पक्ष सोडून हिंदुत्ववादी पक्षात जाणार का? या प्रश्नावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, एकच सांगतो मी हार्डलाइनर नेता कधीही नव्हतो. टोकाची, द्वेषाची भूमिका मी घेतली नाही. भाजपसह सर्वच पक्षांमध्ये असे नेते कालही होते आणि आजही आहेत. विकासाची दृष्टी असलेले अनेक नेते भाजपमध्ये आहेत.
मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा प्रकल्प देशात मोठ्या प्रमाणात उभे राहिले. अनेक लोकाभिमुख योजना आणल्या गेल्या या आणि अशा उपलब्धी आपण मान्यच केल्या पाहिजेत. विकसित भारत संकल्पनेपासून चंद्रयानपासूनच्या अनेक गोष्टीही त्यात नक्कीच येतात. काहींचे मतभेद नक्कीच असतील पण विरोधासाठी विरोध करण्याला अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले.