मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Saunik) यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच मुख्य सचिवांचा दर्जा त्यांना बहाल करण्यात आला आहे. राज्यातील प्रशासकीय यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी व्यापक आणि दिर्घ प्रशासकीय अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नितांत आवश्यकता असल्याने सौनिक यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शासनाने सांगितले आहे. (Former Chief Secretary of the state Manoj Saunik has been appointed as Principal Advisor to the Chief Minister)
मनोज सौनिक हे 31 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना मुदतवाढ नाकारत सौनिक यांच्या जागी नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता सौनिक यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून वर्णी लागली आहे. त्यांच्या पदाचा दर्जा, वेतन आणि भत्ते हे राज्याच्या मुख्य सचिवांप्रमाणेच असणार आहेत.
यापूर्वीही राज्यातील वरिष्ठ पातळीवरील निवृत्त अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदी वर्णी लावण्यात आली आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना सुमित मल्लिक यांची राज्याचे माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर फडणवीस यांनीच उर्विंदर पाल सिंग मदान यांची निवृत्तीनंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांची राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी वर्णी लागली.
यानंतरच्या काळातही मुख्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या अजोय मेहता, सीताराम कुंटे यांची उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सल्लागार म्हणून वर्णी लावली होती. तर मनुकुमार श्रीवास्तव यांची पाच वर्षांसाठी राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता मनोज सौनिक यांचीही मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निवृत्त अधिकारी राज्य सरकारसाठी येन-केन प्रकारे हवेच असल्याचे दिसून येते.