अनेक दिवसांनंतर महिला आयोगाच्या (Rupali Chakankar) माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियातून भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर भूमिका मांडली आहे. अशोक खरातशी माझा कुठलाही आर्थिक संबंध नव्हता. त्याच्या कुठल्याही जमीन व्यवहारात माझी पार्टनरशिप नव्हती. खरातकडे मी कुठल्याही महिलेला घेऊन गेले नाही असे चाकणकर यांनी स्पष्ट केले. खरात प्रकरणात माझी बदनामी करण्यात आली या प्रकरणात बदनामी करणाऱ्या विरोधात मी आता कायदेशीर कारवाई करणार असा इशाराही त्यांनी दिला. तर अनेकांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना किती वर्षांची शिक्षा? श्याम मानव स्पष्टच म्हणाले
खरात प्रकरणात ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता. पण तरीही गेल्या दीड दोन महिन्यांपासून अतिशय अश्लील, अश्लाघ्य भाषेत विधानं करत कोणताही पुरावा नसताना माझ्यावर, माझ्या कुटुंबावरती आरोप करण्यात आले. ते अतिशय वेदनादायक होतं, अशा भावना त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केल्या. तर यावेळी रुपाली चाकणकर यांनी बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर लढा देणार असल्याचे म्हटले आहे. इतरांप्रमाणेच माझ्या कुटुंबियांनी खरात याला गुरू मानले होते. जो पाद्यपूजेचा व्हिडिओ होता, तो अतिशय जुना व्हिडिओ होता. त्यावेळेस मी आयोगाची अध्यक्षही नव्हते असंही त्या म्हणाल्या आहेत.
खरात प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हावा, यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला. तरी सुद्धा ज्या पद्धतीची चिखलफेक झाली. AI चा वापर करून ज्या पद्धतीचे व्हिडिओ तयार करण्यात आले. सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र रचलं गेलं. त्यासाठी आता कायद्याच्या चौकटीतून लढाई लढणार आहे. आशा मिरगे यांना आतापर्यंत मी तीन नोटीस पाठवल्या. मात्र, त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. म्हणून मी कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्या फिर्याद दाखल केली दोन जुलै रोजी त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.
