Free all disease diagnosis camp of MLA Ashutosh Kale : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली 2025-26 च्या गाळप हंगामात उसतोडणी करण्यासाठी आलेल्या सर्व ऊस तोडणी कामगारांसाठी ‘उन्नती शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबीरा अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. बोरनारे यांनी याबाबतची माहिती दिली.
शुक्रवार म्हणजेच 5 डिसेंबर रोजी कर्मवीर शंकरराव काळे (Shankarrao Kale) सहकारी साखर कारखान्याच्या आवारात असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या वसाहतीमध्ये मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी (Health Checkup Camp) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे म्हणाले की, ऊस तोडणी कामगार साखर कारखान्याच्या गळीत हंगामा बरोबरच उद्योग समुहाचा देखील एक महत्वाचा घटक आहे. ऊसतोड कामगारांना ऊस तोडणीच्या अतिशय कष्टाच्या कामामुळे स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. परिणामी भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.
त्यामुळे कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी उन्नती शिबिराच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून तपासणीअंती निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. ऊस तोडणी कामगारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे न चुकता घेवून आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. या आरोग्य शिबिरात ऊस तोडणी कामगारांचे रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, गरोदर महिलांची व लहान मुलांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
या मोफत आरोग्य तपासणी उन्नती शिबीर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी संदीप शिरसाठ, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप हरतवाल, डॉ.शैलेन्द्रकुमार जैन, डॉ.सागर रहाणे, डॉ.गणेश गावडे, डॉ. सोनाली मुरादे, शुभम देशमुख,अमोल गायकवाड, अर्चना कामले, खुशाल बनसोडे, वैभव सोळसे, कृष्णा जऱ्हाड, सीमा धेनक, शीतल म्हस्के आणि सुरेगाव उपकेंद्र अंतर्गत सर्व आशा सेविका उपस्थित होत्या.
