अयोध्येमध्ये काल (22) जानेवारी भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांची (Shree ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना पार पडली. या सोहळ्यादरम्यान प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीसोबतच आणखी एका गोष्टींची जास्त चर्चा झाली. ही गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे 11 दिवसांचे कडक अनुष्ठान. प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापनेसाठी त्यांनी हे 11 दिवसांचे अत्यंत कडक असे व्रत ठेवले होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज (Govindev Giri Maharaj) यांनी त्यांच्याकडून हे व्रत करवून घेतले होते. त्यांच्याच हस्ते काल मोदी यांनी हे व्रत सोडले. (Govinddev Giri Maharaj, who broke the fast of Prime Minister Narendra Modi, hails from Belapur in Ahmednagar district.)
त्यानंतर बोलताना गोविंददेव गिरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता. पण वरिष्ठांनी त्यांनी समजूत काढून त्यांना परत आणले, असा इतिहासही सांगितला. त्यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रात चहुबाजूंनी टीका होत आहे. मात्र या दोन्ही गोष्टींमुळे गोविंददेव गिरी हे देशभरात चांगलेच चर्चेला आले आहेत. याच चर्चेत आलेल्या गोविंददेव गिरी महाराज यांचे महाराष्ट्र आणि त्यातही अहमदनगरचे कनेक्शन आहे. हेच नेमके काय कनेक्शन आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
गोविंददेव गिरी महाराज हे मुळचे नगर जिल्ह्यातील बेलापूरचे आहेत. बेलापूरच्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून त्यांचा हा प्रवास सुरू झाला होता. ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास असणारे त्यांचे वडील मदन महाराज हे राजस्थानातून पौरोहित्य करण्यासाठी त्यावेळी बाजारपेठेचे ठिकाण म्हणून बेलापूरमध्ये स्थायिक झाले. त्यांचे चुलते राधेशाम व्यास हे संघाचे स्वयंसेवक होते. या काकांसोबत ते बालपणीच संघाच्या शाखेत जाऊ लागले. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही बेलापूरमध्येच झाले.
कुशाग्र बुध्दिमत्ता असलेला विद्यार्थी म्हणून शालेय जीवनात गोविंददेव गिरी महाराजांची ओळख होती. याच काळात त्यांनी संघाच्या प्राथमिक वर्गाचेही प्रशिक्षण घेतले. पुढे ते ठाण्यातील स्वाध्याय परिवाराच्या विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी तत्वज्ञान विषयात पदवी घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेशाचे तत्कालिन संघ चालक डॉ. विश्वनाथ देव यांच्याकडे जाऊन वेद आणि उपनिषदांवर अभ्यास केला. दर्शनाचार्य ही पदवी घेतली. अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी बेलापुरात पहिले प्रवचनही दिले. श्रीमद् भागवत, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, योग वसिष्ठ, श्रीदेवी भागवत, छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध विषयांवर ते रसाळ वाणीतून प्रवचन देत असत.
गोविंददेव गिरी महाराज यांनी संत ज्ञानेश्वर गुरूकूल स्थापन केले. सोबतच संगमनेरच्या मालपाणी परिवाराच्या सोबतीने त्यांनी काही काळ युवकांसाठी अभ्यासवर्ग आणि प्रवचनांचे आयोजन केले. तामिळनाडूच्या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या आशिर्वादाने हरिद्वार येथे त्यांनी संन्यास्त जीवनाची दीक्षा घेतली. पुढे हरिद्वार येथील महंत सत्यानंदगीरी महाराजांच्या भारतमाता ट्रस्टचे उत्तराधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. याच काळात विश्व हिंदू परिषदेच्या कामाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.