Download App

महाराष्ट्रात पावसाचा धडाका कायम, राज्यातील 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट.

  • Written By: Last Updated:

Heavy Rain Continues In Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, शेतीबरोबरच घरं, रस्ते आणि काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण व मुंबई विभाग

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Flood) अंदाज वर्तवला गेला आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला (Heavy Rain) आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पावसाच्या अलर्टखाली आहे.

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्र

धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तर नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहमदनगर जिल्ह्यांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ

अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा इशारा

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनीही आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

follow us