आज महाराष्ट्रात कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने काही ठिकाणी दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा (Rain) अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला, काल शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ उष्णतेत वाढ झाली होती. तर ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झाला होता. डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. चंद्रपुरातील जेवती येथे उच्चांकी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मराठवाडा-विदर्भात पावसाचा तडाखा! शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर, विजय वडेट्टीवारांनी केली मदतीची मागणी
दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, आज (ता. २७) सकाळी ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत जमिनीवर येण्याची शक्यता आहे. या ठळक कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. कच्छ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत.
पावसाचा जोर वाढणार असल्याने आज (ता. २७) ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.