Hina Khan Post on Ganeshotsav : गणेश चतुर्थीच्या उत्साहात संपूर्ण (Hina Khan) महाराष्ट्र बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाला असतानाच अभिनेत्री हिना खानने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला हिना खानने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. या भेटीनंतर तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
हिना खानने आपल्या पोस्टमधून गणेशोत्सव साजरा करताना निसर्गाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन केलं. पीओपीमुक्त आणि पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर केल्यास जलस्रोतांचं होणारं नुकसान आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असं तिने म्हटलं आहे. पर्यावरणपूरक मूर्ती हा केवळ ट्रेंड नसून उत्सव साजरा करण्याची योग्य पद्धत असल्याचंही हिनाने स्पष्ट केलं.
गणराया पाऊस घेऊन आला; राज्यात बाप्पाच्या आगमनासोबत वरुणराजाची हजेरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या नेतृत्व आणि पर्यावरणविषयक दृष्टिकोनातून प्रेरणा घेत आपणही या उपक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन हिनाने केलं. निसर्गाचा आदर करणं आणि आपल्याला जीवन देणाऱ्या पर्यावरणाचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं तिने आपल्या संदेशातून सांगितलं. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश तिने दिला.
हिना खानच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुक होत आहे. विविध धर्मांचा आदर करत पर्यावरणाच्या रक्षणासाठी दिलेला तिचा संदेश अनेकांना भावला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिनाने मांडलेल्या या भूमिकेमुळे तिच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
