गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाची भीषण घटना; तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तिघींची मृत्यूशी झुंज सुरू

मध्यरात्रीनंतर साधारण दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले.

Untitled Design (30)

Untitled Design (30)

Horrific snakebite incident at an ashram school : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात असलेल्या जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आणखी तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी रात्री जेवण करून वसतिगृहात झोपल्या होत्या. मध्यरात्रीनंतर साधारण दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थिनींची प्रकृती अचानक बिघडू लागल्याने शाळा प्रशासनाने त्यांना तातडीने उपचारासाठी धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. दरम्यान, अधिक उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेल्या इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचीही उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

या घटनेत इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, इयत्ता सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवीतील समृद्धी नैताम या तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून समृद्धी नैताम हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. सर्प वसतिगृहात कसा शिरला, सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये काही त्रुटी होत्या का, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी शरद पवार गटाचे सर्व 8 खासदार दिल्लीत; राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, सर्पदंशाची आणखी एक दुर्दैवी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे घडली आहे. वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील एका पर्यटकाचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला आहे. गंगाधर मरिअप्पा कोरावार (रा. विजयनगर, कर्नाटक) असे मृत पर्यटकाचे नाव आहे.

गंगाधर कोरावार हे आपल्या सहा मित्रांसोबत आंबोली येथे फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास सर्वजण मुख्य धबधब्यावर आंघोळीचा आनंद घेत असताना अचानक एका विषारी सापाने त्यांना दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच मित्रांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

मान्सूनची पुन्हा जोरदार एंट्री; मुंबईसह कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज

त्यानुसार रुग्णवाहिकेतून सावंतवाडीला नेत असताना वाटेतच गंगाधर कोरावार यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या त्यांचा मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

गडचिरोलीतील आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा मृत्यू आणि सिंधुदुर्गमध्ये पर्यटकाचा सर्पदंशाने झालेला मृत्यू या दोन घटनांनी राज्यात खळबळ उडाली आहे. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने निवासी शाळा, वसतिगृहे, पर्यटनस्थळे आणि ग्रामीण भागात विशेष दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Exit mobile version