Download App

चव्हाणांनी 25 वर्ष जोर लावून चिखलीकरांना विरोध केला… आता त्यांच्याच विजयासाठी मते मागावी लागणार!

दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों… हा शेर जर कुठे अगदी चपखल लागू होत असेल तर तो नांदेडमध्ये. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कडवट विरोधक. गेल्या जवळपास 25 वर्षांपासून दोघांमध्ये विळ्या-भोपळ्याचे राजकीय वैर. यात कधी अशोक चव्हाण वरचढ ठरायचे तर कधी चिखलीकर. पण आता दोघेही एकाच पक्षात असल्याने आणि भाजपने पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनाच उमेदवारी दिल्याने नांदेड (Nanded Lok Sabha) लोकसभेची जागा कायम राखायची असल्यास दोघांनाही एक दिलाने काम करावेच लागणार आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईन अशोक चव्हाणांवर आपल्याच विरोधकाचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. (In Nanded, Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar are known as bitter opponents of each other)

नेमके काय आहे हे राजकारण? पाहुया सविस्तर…

प्रताप पाटील यांचे मूळ गाव म्हणजे कंधार तालुक्यातील चिखली, म्हणून ते प्रताप पाटील-चिखलीकर. त्यांचे वडील गोविंदराव पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात शंकरराव चव्हाण यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आणि चव्हाण कुटुंबियांशी असलेला स्नेह यातून प्रतापरावांचेही युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय पदार्पण झाले. 1989 मध्ये ते चिखली गावचे सरपंच झाले. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी ‘ग्रामविकास शिक्षण संस्था, चिखली’ची स्थापना केली. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची सोय झाली. 1990 च्या दशकात ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. 1992 ते 2002 दरम्यान ते सतत तीनवेळा वेगवेगळ्या मतदारसंघांतून जिल्हा परिषदेवर निवडून आले. अध्यक्षपद वगळता जिल्हा परिषदेतील सर्व पदे भूषविली.

या दरम्यानच्या काळात शंकरराव चव्हाण सक्रिय राजकारणातून बाजूला झाले. त्यानंतर चिखलीकरांनी मराठवाड्यातीलच दुसरे दिग्गज नेते असणाऱ्या देशमुखांचे नेतृत्व स्वीकारले. ते देशमुखांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत चिखलीकरांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. पण चव्हाणांच्या विरोधामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटला. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत राष्‍ट्रवादीच्या शंकरराव धोंडगे यांच्यावर विजय मिळवला. शेकापचा बालेकिल्ला चिखलीकरांनी ताब्यात घेतला. निवडून आल्यानंतर त्यांनी देशमुखांच्या नेतृ्त्वातील आघाडी सरकारलाच पाठिंबा जाहीर केला.

राहुल गांधींचं जीव तोडून भाषण मात्र, पवार मोबाईलमध्ये व्यस्त; भाकरी फिरवण्याची चर्चा कुणाशी?

2009 मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. तेव्हाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार असून देखील चिखलीकरांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी धोंडगेंविरोधात पुन्हा अपक्ष शड्डू ठोकला. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर चिखलीकरांनी राष्ट्रवादीची वाट धरली. पण 2014 ला शंकरअण्णा धोंडगे यांच्या विरोधात तिकीट मिळणार नसल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडूनही आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपात नांदेडचा मतदारसंघ भाजपला सुटला. त्यावेळी भाजपकडे चव्हाणांना फाईट देऊ शकेल असा उमेदवार नसल्याने चिखलीकरांना आयात करुन उमेदवारी देण्यात आली. त्यांनी त्या संधीचे सोने करत अशोक चव्हाणांनी तीनवेळा केलेल्या विरोधाचा एका दणक्यात बदला घेतला. केवळ अशोक चव्हाण यांच्याशी असलेला विरोध व्यक्त करण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांनी जवळपास सर्वच पक्षांची सैर केली.

शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नका, SC ने अजित पवारांना फटकारलं

आताही अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांचा पत्ता कट करण्यासाठी फिल्डिंग लावली होती. माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या स्नूषा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या डॉ. मीनल पाटील-खतगावकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटही घेतली. मागील आठवड्यात पक्षनिरीक्षकांच्या दौऱ्यापूर्वी काही तास आधीच मीनल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या नावाची शिफारस केली होती. पण अशोक चव्हाणांनी लावलेली ही फिल्डिंग भेदून प्रताप पाटील चिखलीकर तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. आता चिखलीकर आणि चव्हाण हे एकाच पक्षात आहेत आणि नांदेड लोकसभेची जागा कायम राखायची असल्यास दोघांनाही एक दिलाने काम करावेच लागणार आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईन अशोक चव्हाणांवर आपल्याच विरोधकाचा प्रचार करण्याची वेळ आली आहे, हेच खरे…

follow us

वेब स्टोरीज