बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील (BEED) मातोरी परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. वर्दीतील एका जबाबदार अधिकाऱ्यावर एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पवन निंबाळकर नावाच्या तरुण पोलीस अधिकाऱ्याचा मातोरी येथील एका तरुणीसोबत विवाह निश्चित झाला होता. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने मोठ्या थाटामाटात साखरपुडाही पार पडला. लग्नाची तारीख जवळ आल्यानं मुलीच्या वडिलांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण जमापुंजी या लग्नासाठी पणाला लावून लग्नाची जोरदार तयारी सुरू केली होती.
सोनं-नाणं, कपडेलत्ते आणि लग्नकार्याचं साहित्य यांची खरेदी करण्यात आली होती. घरामध्ये नातेवाईकांची लगबग सुरू होती आणि लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. परंतु, लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच, नवरदेव पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर याने अचानक लग्नास नकार दिला. या अनपेक्षित नकारानं मुलीच्या कुटुंबावर आभाळच कोसळलं. त्यांना मोठा मानसिक, आर्थिक आणि सामाजिक धक्का बसला आहे.
लग्नानंतर १२ दिवसांनीच उचललं टोकाच पाऊल; बीडमध्ये तरुण तलाठ्याने केली आत्महत्या
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पवन निंबाळकर याने बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप केला आहे. ‘आम्ही पै-पै साठवून मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी आणि लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले. समाजात आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, ऐनवेळी लग्नास नकार देऊन आमचा पैसा, अब्रू आणि मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं.
जेव्हा आम्ही याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला शासकीय बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली’, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. या हायप्रोफाइल प्रकरणानंतर चकलांबा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलीस अधिकारी पवन निंबाळकर याच्याविरुद्ध फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या नातेवाईकांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दोन्ही बाजूंकडून अत्यंत गंभीर आणि परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप झाल्यामुळे चकलांबा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी सुरू केली आहे. एका बाजूला मुलीच्या आयुष्याचा आणि फसवणुकीचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलीस दलातील अधिकाऱ्याची प्रतिष्ठा आणि दोन्ही बाजूंचे दावे आहेत. या प्रकरणातील नेमकं सत्य काय आहे? हे पोलिसांच्या सखोल तपासानंतरच समोर येईल.
