Beed Crime : बीडमधून पुन्हा एकदा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. (Beed) बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर बीडमधून वारंवार गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राला हादरवणारा प्रकार समोर आला आहे.
बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘तुमची मुलगी मला द्या’ म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आला आहे.
खळबळजनक ! बीडमध्ये तरूणीने स्वत:च्या लग्नाच्या दिवशीच मामाच्या घरात घेतला गळफास, धक्कादायक कारण
यानंतर याच शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठं नुकसान देखील केलं. बाजीराव डोईफोडे असं या शिक्षकाचे नाव असून आता या शिक्षकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेले नाही.
या आरोपीविरोधात याआधीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप डोईफोडे यांचे सासरे करीत आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नसून, डोईफोडे कुटुंबीय बीडचे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.