मुंबई : राज्यातील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची माहिती समोर आली आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. यामुळे शिक्षकांच्या वेतनात वाढ होणार आहे.
दरम्यान वाढीव मानधनानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 16 हजार रूपये मानधन मिळणार आहे. तर माध्यमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 18 हजार रूपये तसेच उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना 20 हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येणार आहे.
राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या निर्णयाची अंमलबजावणी रखडली होती. या निवडणुका पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून 1 जानेवारी 2023 पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्येदेखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना 14 हजार रूपये तर पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना 12 हजार रूपये, कनिष्ठ लिपिकास 10 हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती यांना आठ हजार रूपये मानधन मिळणार आहे.
शिक्षकांचे सुधारित मानधन
प्राथमिक, उच्च प्राथमिक – 16000 रु.
माध्यमिक – 18000 रु.
उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय – 20000 रु.
शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ मानधन – 14000 रु.
प्रयोगशाळा सहायक – 12000 रु.
कनिष्ठ लिपिक – 10000 रु.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी – 8000 रु.