Mukhyamantri Mazi Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील कोट्यावधी बहिणींच्या खात्यात दरमहा पैसेही जमा होत आहेत. परंतु, आता या योजनेतही गैरकारभार होऊ लागला आहे. मध्यंतरी थेट बांग्लादेशची महिला या योजनेत लाभार्थी असल्याचे समोर आले होते. आताही असाच बोगस लाभार्थींचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांचं रॅकेट समोर आलं आहे. लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस आयडी तयार केले गेले आणि त्याद्वारे चक्क 1171 अर्ज दाखल केले गेले. अर्ज दाखल केलेल्यांत विविध राज्यांतील रहिवासी दाखवले आहेत.
खळबळजनक! घुसखोर बांगलादेशी महिला झाली ‘लाडकी’ मिळाला योजनेचा लाभ, 5 जण गजाआड
महिला व बालविकास विभाग, पोलीस आणि महसूल विभागाच्या तपासणीत ही गंभीर बाब समोर आली आहे. प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या लॉग इन आयडीवरून 1171 अर्ज दाखल झाले आहेत त्यातील 27 अर्ज एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत.
या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सरकारने स्वतंत्र वेबसाइट तयार केली होती. या वेबसाइटवर लॉग इन आयडीचा पर्याय दिला होता. येथे कुणीही लॉग इन आयडी तयार करून अर्ज करू शकत होता. विशेष म्हणजे या आयडीवरुन स्वतःसह अन्य कितीही महिलांचे अर्ज भरता येऊ शकत होते. याचाच गैरफायदा या भामट्यांनी घेतला. उत्तर प्रदेशातील एका जणाने मुनमुन ठाकरे, अंगणवाडी वर्कर, हजारवाडी ता. पलूस जि. सांगली, अनवरा बेगम, अंगणवाडी वर्कर, बोरगाव बुद्रुक, ता. जि. लातूर या नावाने आयडी तयार केला होता. या दोन आयडींवरून तब्बल 1171 अर्ज भरण्यात आले होते. प्रत्यक्षात लातूर आणि सांगली जिल्ह्यात वरील नावांच्या अंगणवाडी सेविकाच नाहीत असे तपासातून समोर आले.
मोठी बातमी : परकी बहीण लाडकीच राहणार; अपात्र महिलांकडून वसुली नाही; आदिती तटकरेंची घोषणा
अर्ज भरल्यानंतर आधार कार्डची स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे गरजेचे होते. त्यानुसार आधार नंबर टाकून अस्पष्ट दिसणारी प्रत अपलोड करण्यात आली. ज्यावेळी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल तेव्हा आधार कार्डवरील पत्ता दिसणार नाही अशी शक्कल या भामट्यांची होती. परंतु, हा सगळा बनाव आता उघड झाला आहे.
अर्ज भरताना संबंधित अर्जदाराचा आधार लिंक खाते नंबर द्यावा लागत होता. याचीही तपासणी केली असता यात उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान येथील पत्ते आढळून आले. ज्या आयडीवरून अर्ज भरण्यात आले ते देखील बाहेरच्या राज्यातील असल्याचे आढळून आले. आता यातील आरोपी नेमके कोण आहेत याची ओळख करून त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती बार्शी पोलिसांनी दिली.