राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास (ST) भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे आणि उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला परतावा स्वरूपात दिली जाते. या धर्तीवरच दिव्यांग प्रवाशांसाठीही मेट्रो प्रवासात अशाच प्रकारची सवलत द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘पत्रकार रुग्णमित्र’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुंबई मेट्रो प्रशासनाकडे केली आहे.
कैतके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मेट्रो स्थानकांमध्ये व गाड्यांमध्ये दिव्यांग अनुकूल सुविधा अद्याप पूर्णपणे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना सहकारी व्यक्तीची मदत घ्यावी लागते. या अतिरिक्त अडचणींचा विचार करता, दिव्यांग बांधवांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत देणे हे केवळ सामाजिक न्यायाचे नव्हे, तर मानवी दायित्वाचे पाऊल ठरेल.
आशुतोष काळे जनतेविषयी प्रेम व जिव्हाळा असलेला लोकप्रतिनिधी; कृषीमंत्री दत्तामामा भरणेंचे गौरउद्गार
त्यांनी पुढे नमूद केले आहे की, राज्य शासनाने महिला प्रवाशांसाठी केलेल्या निर्णयाप्रमाणेच दिव्यांग प्रवाशांसाठीही शासनाने परतावा स्वरूपात मेट्रो प्रशासनाला आर्थिक मदत देऊन ही सवलत शक्य आहे. दिव्यांगांना दिली जाणारी सवलत ही त्यांच्या शारीरिक मर्यादेची जाणीव ठेवून सन्मानपूर्वक दिलेली मदत ठरावी, अशी अपेक्षा कैतके यांनी व्यक्त केली आहे.
दिव्यांग व्यक्तींना प्रवासात सुलभता व सन्मान मिळावा, यासाठी दीपक कैतके यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या या मागणीला सामाजिक क्षेत्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असून, शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी वाढू लागली आहे.
