ड्रायव्हरकडे एवढा पैसा कुठून आला? विनायक मेटेंच्या मृत्यूवर चार वर्षानंतरही ज्योती मेटेंचा संशय

Vinayak Mete विनायक मेटे अपघात प्रकरणातील आरोप निश्चिती न झाल्याने ज्योती मेटेंचा संताप; चालकाच्या भूमिकेसह ‘अदृश्य हातां’च्या चौकशीची मागणी.

Vinayak Mete Accident Case

Vinayak Mete Accident Case

Jyoti Mete questions the delay in Vinayak Mete Accident Case : शिवसंग्रामचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाला (Vinayak Mete Accident Case) चार वर्षे पूर्ण झाली असली, तरी त्यांच्या मृत्यूभोवतीचे प्रश्न अद्याप कायम आहेत. बीड येथील स्मृतीस्थळावर चौथ्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी अपघात प्रकरणातील न्यायालयीन विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अपघातातील चालकाच्या भूमिकेबाबत सुरुवातीपासूनच संशय असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

‘चालकावर सुरुवातीपासून संशय’

डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले की, अपघातातील चालक एकनाथ कदम याच्यावर आमचा सुरुवातीपासूनच संशय आहे. मात्र, या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया अद्याप पुढे सरकलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पोलीस प्रकरणाला वेगळ वळण देत आहेत; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा आरोप

आरोपी प्रत्येक सुनावणीच्या तारखेला न्यायालयात वारंवार गैरहजर राहत असल्याचा दावा केला, त्यामुळे अद्याप आरोप निश्चितीची म्हणजेच ‘चार्ज फ्रेम’ची प्रक्रिया झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. चार वर्षांचा कालावधी उलटूनही प्रकरणात ठोस प्रगती होत नसल्याने त्यांनी न्यायव्यवस्थेतील विलंबावर प्रश्न उपस्थित केला.

‘आम्ही आमचा माणूस गमावला, भविष्य उद्ध्वस्त झाले’

विनायक मेटे यांच्या निधनामुळे कुटुंबाने मोठी हानी सोसली असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना ज्योती मेटे यांनी व्यक्त केली. मात्र, या प्रकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

न्याय मिळण्यासाठी कुटुंबीयांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असतानाही प्रकरणाची सुनावणी अपेक्षित वेगाने होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चालकाच्या आर्थिक स्थितीवरही सवाल

डॉ. ज्योती मेटे यांनी अपघातातील चालकाच्या सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवरही प्रश्न उपस्थित केले. संबंधित चालक आजही सामाजिक जीवनात सक्रियपणे वावरत असल्याचा दावा त्यांनी केला.

मिमिक्री करायची असेल तर चित्रपटात जा; राहुल गांधींच्या वर्तनावर एकनाथ शिंदेंचा उपरोधिक टोला

त्याच्याकडे आलिशान गाड्या असून बैलगाडा शर्यतींसारख्या महागड्या छंदांसाठी पैसा कुठून येतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या आर्थिक व्यवहारांची आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, चालकाच्या आर्थिक स्थितीबाबत केलेले आरोप हे ज्योती मेटे यांनी उपस्थित केलेले प्रश्न असून, त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे.

‘या मागे अदृश्य हातांची चौकशी करा’

या संपूर्ण प्रकरणामागे काही ‘अदृश्य हात’ आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी ज्योती मेटे यांनी केली. अपघाताची घटना, त्यानंतरची तपास प्रक्रिया आणि न्यायालयीन कार्यवाही याबाबत अधिक सखोल तपास व्हावा, अशी त्यांची भूमिका आहे. चार वर्षांनंतरही प्रकरणातील आरोप निश्चिती न झाल्याने तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवसंग्रामला राजकीय वाटा न मिळाल्याची खंत

विनायक मेटे यांच्या निधनानंतर महायुती सरकारमध्ये शिवसंग्राम पक्षाला आणि पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अपेक्षित राजकीय वाटा मिळाला नसल्याची खंतही ज्योती मेटे यांनी व्यक्त केली. विनायक मेटे यांनी आयुष्यभर मराठा समाजासह विविध सामाजिक प्रश्नांसाठी काम केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाला अपेक्षित स्थान मिळाले नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर महाराष्ट्रात कुणा-कुणाचा गौरव पाहा यादी…

फडणवीसांची भेट घेणार

या सर्व मुद्द्यांवर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे डॉ. ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब, अपघातातील चालकाची भूमिका, त्याची आर्थिक पार्श्वभूमी आणि शिवसंग्रामच्या राजकीय भवितव्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चार वर्षांनंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत मेटे कुटुंब

14 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर या अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले. आता चार वर्षांनंतरही न्यायालयीन प्रक्रिया पूर्णत्वाकडे न गेल्याने कुटुंबीयांची नाराजी पुन्हा समोर आली आहे.

‘पाण्याचा प्रत्येक थेंब रेड लाईन’; पाकिस्तानचा पंतप्रधान भारताविरुद्ध पुन्हा बरळला!

ज्योती मेटे यांच्या आरोपांमुळे विनायक मेटे अपघात प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पुढे कशी सरकते आणि त्यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Exit mobile version