पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, धैर्यशील मानेंकडून थेट उमेदवाराच्या नावाची घोषणा

Pune Graduate Constituency Election : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत तणाव वाढल्याचं चित्र आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 27T214515.054

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश चिवटे उमेदवारीसाठी इच्छुक असून, त्यांना महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाने पुणे शिक्षक मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान आणि 27 ऑक्टोबरला मतमोजणी जाहीर केली आहे. मात्र, महायुतीतील जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नसल्याने उमेदवारीवरून घटक पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूर येथे झालेल्या शिक्षक मेळाव्यात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला. महायुतीकडून चिवटे यांना उमेदवारी मिळाली नाही, तरी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, अशी भूमिका यड्रावकर यांनी मांडली. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत निर्णयापूर्वीच चिवटेंसाठी पर्यायी राजकीय व्यवस्था उभी करण्याची भूमिका जाहीर झाली आहे.

यड्रावकर यांनी चिवटे यांना निवडणुकीच्या तयारीत माघार न घेता पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा सल्ला दिला. आपल्या शिरोळ तालुक्यात सुमारे 75 हायस्कूल आणि कॉलेज असून, तेथे 1,400 पेक्षा अधिक शिक्षक मतदार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यापैकी 1,200 मतं चिवटे यांच्या बाजूने मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. तसेच निवडणुकीच्या नियोजनासाठी संजय पाटील-यड्रावकर यांची साथ देण्याचंही त्यांनी सांगितलं.

वेळ आली तर दोन्ही जागा लढणार! पुणे पदवीधर अन् शिक्षकबाबत मंत्री गोरेंचं मोठं वक्तव्य

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनीही पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा, यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली. महायुतीतून उमेदवारी मिळाली नाही, तर यड्रावकर यांनी सांगितलेल्या पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांना पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे चिवटे यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून एकसंध भूमिका मांडली जात असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतील जागावाटप अद्याप अंतिम झालेलं नाही. भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आला असून, शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय इतर इच्छुकांचीही नावे पुढे आली आहेत. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीसाठीची हालचाल वाढली असून अंतिम निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीचा विषय महायुतीतील जागावाटपाशी जोडला गेल्याने पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याआधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या कोणत्याही उमेदवाराची अंतिम उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झालेली नसताना यड्रावकर आणि धैर्यशील माने यांच्या वक्तव्यामुळे चिवटे यांच्या समर्थनाची भूमिका स्पष्ट झाली आहे. आता महायुतीकडून या मतदारसंघाबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागलं आहे.

follow us