मंत्र्यांचे शिलेदार मैदानात उतरणार ; पुणे पदवीधर, शिक्षकसाठी महायुती एकमेंकांविरुद्ध शड्डू ठोकणार ?

Graduate and Teachers Constituency Election 2026 : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपला (BJP) दोन्ही जागांवर धोबीपछाड मिळाली होती.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Pune Division Graduate And Teachers Constituency Election 2026

Pune Division Graduate and Teachers Constituency Election 2026 : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या मतदारसंघासाठी महायुतीमध्ये जोरदार चुरस आहे. अनेक मंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी विधानपरिषदेसाठी जोरदार फिल्डिंग लावलीय. महायुतीतील तिन्ही पक्षांमधील इच्छुकांची संख्या पाहता महायुतीमध्येच या निवडणुकीसाठी घमासान पाहिला मिळणार आहे. कोणत्या पक्षाकडून कोण रिंगणात उतरणार ? कोणता मंत्री कोणासाठी फिल्डिंग लावतोय. महाविकास आघाडीकडून कोण रिंगणात उतरणार हेच पाहुया…

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपला (BJP) दोन्ही जागांवर धोबीपछाड मिळाली होती. शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) जयंत आजगावकर विजयी झाले होते. तर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी बाजी मारली होती. त्यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला होता. परंतु लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण बदलले आहेत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. शिक्षक मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे.


शिवसेनेकडून मंत्र्यांचे ओएसडी रिंगणात उतरणार ?

शिक्षक मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी तयारी सुरू केलेली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे चिवटेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. चिवटे हे सोलापूरचे आहेत. शिवसेनेकडून सचिन सानपही इच्छुक आहेत. ते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणजे ओएसडी आहेत. म्हणजेच सेनेमध्येच दोन मोठ्या व्यक्तींचे ओएसडी निवडणुकीच मैदानात उतरण्याचा तयारीत आहेत. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रमुख व माजी आमदार दत्तात्रय सावंत हेही निवडणुकीच्या तयारी करत आहे. ते भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करतायत. काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आजगावकर व नंदकुमार सागर हे इच्छुक आहेत.

चंद्रकांत पाटील यांचा शिलेदार मैदानात
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय कौस्तुभ गावडे हे रिंगणात उतरू शकतात. कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हे चंद्रकांत पाटील यांची आहे. तर गावडे हे या संस्थेवर मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. भाजप आणि शिवसेनेकडून आपल्यालाच उमेदवारी मिळले असा दावा त्यांचा आहे.

पदवीधरसाठी इच्छुकांची संख्या मोठी
पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपले निकटवर्तीय भैया माने यांची उमेदवारीच जाहीर करून टाकली आहे. तर भाजपने आमदार अरुण लाड यांचा मुलगा शरद लाड यांना पक्षात घेऊन थेट उमेदवारी जाहीर केलेली आहेत. हर्षदा देशमुख-जाधव या भाजप किंवा राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. तर महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.


तर शरद लाडविरुद्ध विश्वजित कदम भाचा रिंगणात उतरविणार ?

पदवीधर मतदारसंघात आणखी एक ट्वीस्ट आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचा मुलगा शरद लाड हे भाजपमध्ये आहेत. त्यांना भाजपने उमेदवारी दिलास काँग्रेसकडून आमदार विश्वजित कदम हे वेगळी खेळी करू शकतात. ते आपले भाचे ऋषिकेश महेंद्र लाड यांना मैदानात उतरू शकतात. लाड हे सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. कदम आणि लाड यांच्या विधानसभेला राजकीय संघर्ष झालेला आहे. परंतु मागील निवडणुकीत विश्वजित कदम आणि लाड यांच्या समझोता झाला होता. पण आता शरद लाड हे मैदानात उतरल्यानंतर विश्वजित कदम हे आपले भाचे महेंद्र लाड यांना रिंगणात उतरू शकतात.

महायुती वेगवेगळे लढणार ?
पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतील तिन्ही पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षाकडे प्रबळ दावेदार असल्याने तिन्ही पक्ष स्वतंत्र रिंगणात उतरू शकतात. तसे संकेत सोलापूरचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीनेही पदवीधर मतदारसंघावर दावा ठोकलेला आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघासाठी महायुतीतील तिन्ही पक्षात घसामान होण्याची शक्यता आहे.

follow us