Kaka Koyte steps down from post : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली असताना या प्रकरणाच्या भोवऱ्यात आता राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे अडकले आहेत. वाढत्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर अखेर काका कोयटे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. समता नागरी पतसंस्थेचे संस्थापक असलेले काका कोयटे हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पतसंस्था फेडरेशनचे नेतृत्व करत होते. मात्र, अशोक खरात प्रकरणाशी समता पतसंस्थेचे संबंध उघड होताच त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपांमुळे कोयटे यांच्यावर दबाव वाढत गेला.
शिर्डी येथील समता पतसंस्थेत शंभरहून अधिक संशयास्पद खाती आढळून आली असून, या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. या खात्यांमध्ये काही राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींची नावे देखील समोर आल्याने प्रकरण अधिकच गाजू लागले. या सर्व घडामोडींमुळे पतसंस्थेच्या कारभारावर आणि अप्रत्यक्षपणे काका कोयटे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले. प्रकरण उघडकीस झाल्यानंतर काका कोयटे यांनी सुरूवातीला पतसंस्थेत सर्व व्यवहार कायदेशीर पद्धतीनेच झाल्याचा दावा केला होता. मात्र, पोलीस तपासात नव्याने समोर येणाऱ्या माहितीमुळे परिस्थिती बदलत गेली.
बंगाल अन् तमिळनाडूत बंपर मतदान; सत्ता बदल होणार की सत्ताधारी मारणार बाजी?
सभासदांकडून देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णय घेतला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्यभरातील सुमारे १५ हजार पतसंस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या फेडरेशनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शिर्डी पोलिसांकडून समता पतसंस्थेत संशयास्पद खात्यांची सखोल चौकशी सुरू असून, अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तपासातून पुढे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, अशोक खरात प्रकरणामुळे केवळ धार्मिक आणि सामाजिक नव्हे, तर आर्थिक आणि संस्थात्मक पातळीवर देखोल गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, काका कोयटे यांच्या राजीनाम्यामुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाल्याचे मानले जात आहे.
