Download App

राहुल सोलापूरकरचा माफीतही कावा; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप..

अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी माफी मागतानाही कावेबाजपणा केल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे.

Kiran Mane Criticized Rahul Solapurkar : मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) चर्चेत आहेत. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत. टीकेची झोड उठली आहे. आता अभिनेते किरण माने यांनीही राहुल सोलापूरकर यांना चांगलंच सुनावलं आहे. या वक्तव्यानंतर सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली होती. त्यांच्या याच माफीच्या व्हिडिओवर किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूरकर यांनी माफी मागतानाही महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचे माने यांनी म्हटले आहे.

किरण माने यांची पोस्ट काय?

किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. यात ते लिहीतात की, माझ्या बहुजन शिवभक्तांनो, शिवजयंतीला तुम्ही कुणाचे व्याख्यान आयोजित करत आहात त्याचा मेंदू आणि विचार पूर्ण तपासून बोलवा. गेली अनेक दशकं छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत त्यांच्याविषयी खोट्या गोष्टी पेरणाऱ्या एका पुणेरी बाजारबुणग्या शिवशाहीराची पिलावळ मनुवाद्यांचा छुपा अजेंडा राबवत आहे. व्याख्यानांतूनही विष पेरलं जात आहे.

काल तो सोलापूरकर माफी मागताना जे बोललो ते नीट ऐका म्हणजे या मनुवादी बांडगुळांचं कपट कळेल. माफी मागतानाही या भिकारड्याने कावा खेळलाय. सामदामदंडभेद हा निगेटिव्ह शब्द प्रयोग जाणीवपूर्वक खुपसला आहे. राज्यकर्ते सामदामदंडभेद वापरतात म्हणजे काय हो असा सवाल किरण माने यांनी या पोस्टमध्ये केला आहे.

राजांचा जयजयकार तर करायचा.. त्यांना महान तर म्हणायचं पण गुणगान गात गात शा‍ब्दिक खेळ खेळून त्यांचं कार्य लहान करायचं हे कपट वर्षानुवर्षे सुरू आहे. कधी अलगदपणे लाच शब्द वापरायचा तर कधी सामदाम अशा शब्दांत किरण माने यांनी राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांच्यावर टीका केली आहे.

राहुल सोलापूरकर सारख्यांच्या जिभा हासाडायला पाहिजे; उदयनराजे भोसले संतापले

काय आहे वाद?

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर चौफेर बाजूंनी टीका झाली. राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर वाद वाढला. त्यांच्यावर जोरदार टीका झाली. घराबाहेर आंदोलने झाली. राहुल सोलापूरकर यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली.

follow us