Refinery Survey In Kokan : कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून हे सर्वेक्षण सुरू होताच नागरिकांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत तीन जाणांना अटक देखील केली आहे. मात्र या अटकेविरोधात आता विविध संघटना मैदानात उतरल्या आहेत.
त्यांनी एका पत्राद्वारे या अटकेचा निषेध करत या आंदोलकांना तात्काळ सोडण्याची मागणी केली आहे. या पत्रामध्ये म्हटले आहे की, बारसू सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामसभेंच्या रिफायनरी विरोधी ठराव असूनही ग्रामस्थांना विश्वासात न घेता जमीन सर्वेक्षण करण्यास सरकार प्रचंड पोलीस बळाचा वापर करत आहेत. स्थानिक नागरिकांचा विरोध असतांना सरकार रिफायनरी प्रकल्प का करत आहे? उद्योगमंत्र्यांना हाताशी धरून बारसूतीळ नागरिकांवर दडपशाही केली जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
या सर्वेक्षणासाठी आज पुन्हा पोलीस निघाले असताना महिला आंदोलकांनी रस्त्यावर झोपून पोलिसांच्या गाड्या अडवल्या आहेत. त्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील तणाव वाढलेला पाहायला मिळत आहे.
या सगळ्या आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष घालणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली की उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती घेतली असून वेळ आली तर आम्हाला तिथं जावे लागेल म्हणत सरकारला इशारा दिला आहे.
बारसू रिफायनरीविरोधात प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सर्व्हेला नागरिकांनी विरोध केल्यानंतर त्याला अटक केली जात आहे. उद्या त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जाईल. सरकारला जालियनवाला बाग हत्याकांडासारखं बारसू हत्याकांड घडवायचं आहे का? असा गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.