Malwan Nagarparishad Election : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा अंतिम निकाल आता जवळपास निश्चित झालायं. या निवडणुकांमध्ये चर्चेची ठरली ती म्हणजे मालवण नगरपरिषदेची निवडणूक. कारण या निवडणुकीत भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या निवडणुकीत सख्ख्या भावाशी वैर आणि स्टिंग ऑपरेशन करीत निलेश राणे यांनी अखेर ही निवडणूक जिंकलीयं.
मालवण नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षासह २० पैकी १० नगरसेवक निवडून आणले. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता मनमोहन वराडकर यांनी भाजपच्या उमेदवार शिल्पा यतीन खोत यांचा १०१९ मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. त्यामुळे मालवण नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला. मालवणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अर्थात राणे बंधूंमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. मालवण नगरपरिषदेसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. त्याआधी मालवणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची घरी धाड मारत आमदार निलेश राणे यांनी भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपाची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. एवढंच नाही तर या प्रकरणात पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोग दखल घेत नसल्याचंही राणेंनी म्हंटलं होतं.
स्टिंग ऑपरेशन करत मालवणमध्ये भाजपचा पदाधिकारी असलेल्याच्या थेट घरातच निलेश राणे शिरले होते. त्यावेळी पैशांनी भरलेल्या बॅगेचं व्हिडिओ चित्रीकरण करत सोशल मीडियावर व्हिडिओदेखील शेअर केला होता. त्यानंतर मालवणच्या भाजप पदाधिकाऱ्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. एवढंच नाही तर त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये जाहीर सभा घेत थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर त्यांनी सडकून टीका केल्याचे दिसून आले होते.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ मल्याळम अभिनेते श्रीनिवासन यांचे वयाच्या 69 वर्षी निधन
दरम्यान, मालवण नगर परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे राणे बंधू यांच्यातील संघर्ष. आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा याकरिता दोन्ही नितेश आणि नीलेश यांनी भरपूर प्रयत्न केले. नीलेश राणे यांनी तर भाजप उमेदवाराच्या घरात घुसून पैशाचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून राज्यात खळबळ माजवून दिली. अगदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मालवणच्या निवडणुकीची दखल घ्यावी लागली होती. राणे बंधूंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत होत्या. मी विकासावर बोलतोय, परंतु भाजपने पैशांचा महापूर आणलाय, असे म्हणून नीलेश राणे थेटपणे नितेश राणे यांच्यावर तोफ डागत होते.
