Ravindra Chavan work Project: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप-शिवसेना सरकार आले. या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री, तसेच एक वर्षासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी आलेले भाजप नेते रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan)यांनी सिंधुदुर्ग (Sindhudurg)व पालघर या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही भूषविले. या काळात त्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त विकासांची कामे केली. सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीरित्या बजावत दोन्ही जिल्ह्यांसाठी हजारो कोटींचा निधी मिळविला. त्यातून सिंधुदुर्गमध्ये चव्हाण यांच्या काळात काय बदल झाला?. रेल्वे स्थानक, कातकरी समाजाचे किती प्रश्न सुटले हे जाणून घेऊया…
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी तब्बल साडेपाच कोटींचा निधी
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी तब्बल 5 हजार 450 कोटी रुपयांचा निधी आणला. कोणत्याही पालकमंत्र्यांपेक्षा चव्हाण यांनी सर्वाधिक निधी आणल्याचे बोलले जात आहे. या निधीतून शासकीय इमारतींची उभारणी, नुतनीकरण आणि विस्तारीकरणावर भर दिली. त्यामुळे नागरिकांना पुढील अनेक वर्षांसाठी सुसज्ज आणि प्रशस्त शासकीय कार्यालयातून चांगली सेवा मिळेल. त्यातून बांदा, कुडाळ, आंबोली, सिंधुदुर्ग, आंबोली, मालवण, कणकवलीतील कनकनगरी या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतींचे नुतनीकरण झाले.
कोकण रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नात कोकण रेल्वेमार्गावरील बारा प्रमुख रेल्वे स्टेशन परिसरांचा कायापालट झाला. रेल्वे स्टेशन परिसरातील जोडरस्त्यांचे क्राँक्रिटीकरण आणि सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेस्थानकांना मुख्य रस्त्यांशी जोडणारे रस्ते काँक्रेटिकरण आता हे सुशोभित, सुसज्ज आणि अद्ययावत रेल्वे स्थानक परिसर कोकणवासी आणि पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. केवळ जुन्या पद्धतीने रेल्वे स्थानक परिसरांची डागडुजी करण्याऐवजी या परिसरात आधुनिक सोयी-सुविधा उभारण्यावर चव्हाण यांनी भर दिला आहे. विमानतळासारखी भव्य कॅनोपी रचना, आकर्षक आणि आधुनिक बसस्थानक, प्रवाशांसाठी शेड, टू व्हीलर, फोर व्हीलर, रिक्षा आणि बसगाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षलागवड आणि पादचाऱ्यांसाठी फुटपाथ, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह अशा अनेक सोई-सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे-स्थानक परिसराला एअरपोर्टसारखा लूक मिळाला आहे. यामुळे आता कोकण रेल्वेने कोकणात जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्थानक परिसर बघून समाधान वाटत आहे. तसेच कोकणातील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे.
कातकरी समाजाचा प्रश्न मार्गी
सिंधुदुर्ग कातकरी समाजातील 70-75 कुटुंबे बेघर राहिली होती. या कुटुंबांना घर बांधण्यासाठी निधी मंजूर झाला होता. पण शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्याने त्यांचा खोळंबा झाला होता. रविंद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबाराच्या प्रसंगी कातकरी बांधवांनी आपली व्यथा मांडली, त्यावर क्षणाचाही वेळ न लागता रविंद्र चव्हाण यांनी कातकरी कुटुंबांना ओसरगाव येथील स्वतःच्या मालकीची जमीन दिली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला. तसेच त्यांना हक्काचे घर मिळाले.
जनता दरबार
आपले प्रश्न सरकार दप्तरी रखडले की ते पूर्ण करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागतात, हे तुम्हीही अनुभवलं असेल. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा त्रास वाचवण्यासाठी रविंद्र चव्हाण यांनी जनता दरबार भरवला. या माध्यमातून नागरिकांना ४२ शासकीय विभागांचे अधिकारी एका छताखाली आल्याचं पाहायला मिळालं. अशा प्रकारचा जनता दरबार दोनदा पार पडला आणि त्यात सिंधुदूर्गवासियांचे शेकडो प्रश्न तत्काळ सोडवण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट
रस्ते, रेल्वेस्थानकाबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीनसारखा एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. त्यातून माणगाव, बांदा, आचरा, मसुरे, भेडशी, रेडी, गोळवण, निरवडे, पेंडुर चौके अशा एकूण दहा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा उपक्रम राबविण्यात येतोय. त्यातून 33 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतलाय. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील रेडकर हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिक केअर अँड क्युअर सेंटर उभारण्यात आले. या सेंटरमध्ये वैद्यकीय सुश्रुषा, उपचार आणि पुनर्वसन आदी सुविधा देण्यात येत आहेत.
जिल्हा नियोजन समितीतून मोठा निधी
2024-25 या आर्थिक वर्षासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातील 83 कोटी रुपये प्राप्त झालेत. तर 185 कोटींच्या नियोजन आराखड्यास मंजुरी मिळाली.
कोकणातील देवस्थानांचा विकास
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी, कुणकेश्वर अशा प्रमुख मंदिरापर्यंत जाणारे पक्के रस्ते बांधले आहेत. आंगणेवाडी देवस्थान पसिररात मोबाइल नेटवर्क, शौचालय, प्रसाधनगृहे अशा वेगवेगळ्या सुविधाही उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांची यात्रा सुलभ झालीय. त्याचबरोबर कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये मच्छिमार्केट इमारत, तेथील विहिर बांधणे, अटलबिहारी वाजपेयी उद्यानाबाहेर बचत गटांसाठी स्टॉल उभारणे असे रोजगाराभिमुख कामेही केली आहेत.
रविंद्र चव्हाण यांनी पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून दिला. त्यातून रस्ते, रेल्वे, आरोग्यकेंद्र, देवस्थान, गड किल्ल्यांची पुनर्बांधणी असे काम करून सिंधुदुर्गाच्या विकासाला चालना दिली आहे. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांच्या रस्त्यांसाठीही हजारो कोटींचा निधी दिला. त्यामुळे रविंद्र चव्हाण हे कोकणच्या विकासाला चालना देणारे ठरले हे नक्की.