Uddhav Thackeray Reaction on Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Nirmala Sitharaman) आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प सादर (Budget 2024) केला. या बजेटवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी रायगड येथील जाहीर सभेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच अर्थमंत्री सितारामन यांचे खोचक शब्दांत कौतुकही केले. उद्धव ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत. पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
निर्मला सितारामन यांचं अभिनंदन
या सभेतून ठाकरे म्हणाले, मोदी सरकारचे शेवटचे बजेट सितारामन यांनी सादर केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्या म्हणाल्या, की या देशात चार जातींसाठी आम्ही काम करत आहोत. त्या जाती कोणत्या तर शेतकरी, महिला, युवक आणि गरीब. मोदींसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी केलं यासाठी सितारामन यांचं अभिनंदन. निवडणुका आल्यानंतर का होईना त्यांनी मान्य केलं की हा देश तुमच्या अदानी-अंबानी मित्रांचा नाही तर या पलीकडे हा देश गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांचा आहे. सत्तेच्या दहाव्या वर्षी मोदींना कळलं की अदानींचा नाही तर हा देश सामान्यांचा आहे, अशी खोचक टीका ठाकरे यांनी केली.
Budget 2024 : महिला अन् गरीबांना ‘अच्छे दिन’, मध्यमवर्गीयांना झटका; मोदींच्या बजेटमध्ये कुणाला काय?
अर्थसंकल्प म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार
आधी आपल्याकडे जादूचे प्रयोग व्हायचे. अजूनही होत असतील. तुम्ही जर पाहिलं नसेल तर आता दिल्लीतही तसेच जादूचे प्रयोग सुरू आहेत. आधी आपल्याला दिसायचं की जादूगार यायचा. रिकामी टोपी दाखवून त्यावर फडकं ठेवायचा. मंत्र म्हणून टोपीत हात घालायचा आणि कबूतर काढून दाखवायचा. आपण म्हणायचो काय अचाट माणूस आहे रिकाम्या टोपीतून कबूतर काढून दाखवलं आता माझं मत यालाच. त्यावेळी आपल्या लक्षात आलं नाही की कबूतर उडून गेलं आणि आपल्याला टोपी घातली गेली.
आजचा हा अर्थसंकल्प सुद्धा टोप्या घालण्याचाच प्रकार आहे. आता काहीतरी घोषणा करतील. फुकटात गॅसही देतील आणि निवडणूक झाली की तिप्पट भाव वाढवतील. आम्हाला तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही. या सरकारलाच गाडायची गरज आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.