सिंधुदुर्ग : स्वत:च्या सख्ख्या चुलत भावाचं घरासमोर डोकं फोडलं, त्यानंतर भावाला जाळून मारुन टाकल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर केला आहे. राऊत यांच्या गंभीर आरोपानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ते सिंधुदुर्गमधील कणकवलीत एका कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कारकीर्दीत अनेकांचा बळी गेला आहे. अनेक लोकं बेपत्ता झालेली आहेत. राणेंनी स्वत:च्या सख्ख्या चुलत भावाचं घरासमोर डोकं फोडलं, त्यानंतर भावाला जाळून मारुन टाकल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
तसेच शिवसेनेच्या काळात एकही बळी गेला नसून एकही जण बेपत्ता झाल्याची घटना नाही. त्यामुळे नारायण राणेंची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलीय.
कार्यक्रमात बोलताना त्यांनी नारायण राणेंसह नितेश राणेंवरही टीका केलीय. नितेश राणेंची उंची किती, डोकं केवढं, त्यामध्ये अक्कल किती? आपण बोलतोय किती? नितेश राणेंनी आपल्या वडिलांची राजकीय कारकीर्द आठवावी असंही ते म्हणाले आहेत.
राऊतांनी राणे कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे कोकणातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता आरोपांवर राणे कुटुंबिय काय भूमिका घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
दरम्यान, आम्हांला या जिल्ह्यात शांतता हवी असल्याचंही ते म्हणाले आहेत. कणकवलीत झालेल्या या कार्यक्रमात वैभव नाईक, सतीश सावंत, खासदार विनायक राऊत अरुण दुधवडकर, संदेश पारकर आदी उपस्थित होते.