Download App

कुणाल कामराच्या अडचणीत आणखी वाढ; मुंबई पोलिसांची तिसरी नोटीस धडकली

मुंबई पोलिसांनी याआधी दोन वेळेस समन्स बजावले होते. मात्र या दोन्ही वेळी कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिला नाही.

Kunal Kamra Summons by Mumbai Police : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या (Kunal Kamra) अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तिसरे समन्स बजावले आहे. येत्या 5 एप्रिल रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहा अशा सूचना या समन्समध्ये देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याआधी दोन वेळेस समन्स बजावले होते. मात्र या दोन्ही वेळी कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिला नाही. कुणाल कामराने एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे एक विडंबन गीत सादर केले होते. याचे संतप्त पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले होते.

या गाण्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. यानंतर कामराला मद्रास हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली. दुसऱ्यांदा समन्स बजावूनही कुणाल कामरा का आला नाही याची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले होते. परंतु, त्याच्या घरच्यांनी तो येथे नाही असे सांगितल्यानंतर पोलिसांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. यानंतर पोलिसांनी तिसरी नोटीस जारी केली आहे.

कुणाल कामराचा शो पाहणारे प्रेक्षकही अडचणीत; मुंबई पोलिसांनी नोटीसाच धाडल्या

मद्रास हायकोर्टाकडून दिलासा

या प्रकरणी कामराने मद्रास हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. कामराविरुद्ध महाराष्ट्रात खटले दाखल आहेत. मात्र तो तामिळनाडूत आहे. मद्रास हायकोर्टाने 7 एप्रिलपर्यंत त्याच्यावर कोणतीच कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. कामराने न्यायालयात सांगितले होते की 2021 मध्ये मुंबईतून तामिळनाडूत आलो होतो. तेव्हापासून मी याच राज्याचा रहिवासी आहे. मुंबई पोलीस अटक करतील अशी भीती वाटते.

शिंदे समर्थकांकडून एफआयआर दाखल

शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरुन 24 मार्च रोजी कुणाल कामराविरुद्ध एफआयआर दाखल केली. यानंतर चौकशीसाठी म्हणून त्याला दोन समन्स देखील बजावले. कामराविरुद्ध खार पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. एक तक्रार जळगावच्या महापौरांनी दाखल केली आहे. तर अन्य दोन तक्रारी नाशिक येथील हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकाने दाखल केल्या आहेत.

जिथे राहत नाही तिथे, जाऊन येणे म्हणजे…; कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना टोला

शोला उपस्थित प्रेक्षकांनाही नोटीसा

कुणाल कामराने 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटेट स्टुडिओत नया भारत हा शो आयोजित केला होता. याच शोमध्ये कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करणारे विडंबनात्मक गीत सादर केले होते. या शोला जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांनाही पोलिसांना नोटीसा बजावल्या आहेत. प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. काही जणांचे जबाब घेण्यास सुरुवातही झाली आहे. पोलिसांनी कलम 179 अंतर्गत या नोटीसा बजावल्या आहेत.

follow us