Download App

लेट्सअप विश्लेषण : ‘कमळा’ला का पडली ‘इंजिना’ची गरज; ही आहेत ‘हायलाईटेड’ 5 कारणं

  • Written By: Last Updated:

मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू झाली आहे. भाजपनं महाराष्ट्रात 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. मात्र, अद्याप काही जागांवरून महायुतीत तिढा कायम आहे. हा तिढा कायम असतानाच आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीतील हायकमांडने राज ठाकरेंना (Raj Thackeray) दिल्लीत आमंत्रण दिले आहे. भाजपनं राज्यात मिशन 45 प्लस निश्चत करण्यात आले आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या काही सर्व्हेमधून NDA महाराष्ट्रात (Maharashtra Loksabha) 30 ते 32 जागांवर विजय मिळवू शकते असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे NDA ची धाकधूक वाढली आहे. मिशन 45 प्लस गाठायचं असल्यास भाजपला राज यांची मोठी मदत होऊ शकते. त्यामुळेच महायुतीत मनसेची एन्ट्री फिक्स मानली जात आहे. मात्र, भाजप सारख्या महाशक्तीला राज्यातील मनसे आणि अन्य प्रादेशिक पक्षांची का गरज भासली याची पाच हायलाईटेड कारणं आपण जाणून घेऊया. (Why MNS & Raj Thackeray Is More Importatant For Loksabha Election In Maharashtra)

ठरलं, ठाकरेंची शिवसेना 22 जागा लढवणार! शिलेदारांची नावेही आली समोर

1.मुंबई, पुणे,नाशिक पट्यात होणार मदत

राज यांच्या पक्षाचा जरी सध्या एकच आमदार असला तरी, राज यांच्या मनसेची (MNS) ताकद मुंबई, पुणे, नाशिक या पट्ट्यात अधिक आहे. येथे भाजपनं त्यांचा उमेदवार उभा केल्यास राज यांच्या मदतीने हा उमेदवार नक्की विजय मिळवेल असे मानले जात आहे. या तिनही मतदार संघातील मनसेची मते महायुतीला मिळवून मिशन 45 प्लस गाठण्यासह मदत होणार आहे. त्यामुळे राज यांना महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी लगबग सुरू असून, या जागांच्या बदल्यात मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा दिली जाण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण मुंबईतून राज ठाकरेंचे विश्वासू नेते बाळा नांदगावकर निवडणूक लढवू शकतात अशीदेखील चर्चा आहे.

2. भावनिक मुंबईकरांची उद्धव ठाकरेंना साथ

मनसेला महायुतीत जोडून घेण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेना पक्षातील फुटीनंतर अनेक मुंबईकरांची भानविक साथ उद्धव ठाकरेंसोबत आहे. याचा अनुभव मध्यंतरी पार पडलेल्या सभा, पक्ष प्रवेश आदींवरून अधोरेखित होत आहे. एवढेच नव्हे तर, प्रत्येक राजकीय पक्षाचे मुंबईतील सहा जागा जिंकण्याचा प्रयत्न आहे. त्यात भाजप शिवसेनेच्या युतीने या सहाही जागा प्रत्येकी तीन तीन अशा उमेदवारांच्या विजयाने जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर शिंदेंनी बंडखोरी करत पक्ष फोडला. त्यावेळी सेनेचे विजयी तीन खासदार शिंदेसोबत गेले. उद्धव यांच्याकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही हिरावून घेतले गेले. हा निर्णय मुंबईसह राज्यातील अनेक मतदारांना रूजला नाही. या सर्वांचे मत आणि मनपरिवर्तन करण्याची ताकद आणि कसबं राज यांच्याकडे असल्याचे ठाम मत भाजप वाटत आहे.

Loksabha Election : पुन्हा भाजपच ! पण 370 जागांची ‘गॅरंटी फेल’ होणार?

3. ठाकरेंना शह देण्यासाठी ठाकरेचं हवे

पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर मुंबई, ठाण्यासह कोकणात उद्धव ठाकरेंना जनतेची भावनिक साथ मिळत असल्याचे चित्र दिसून आले आहे. मध्यंतरी ठाकरेंनी घेतलेल्या खळा बैठकांमधून कोकणवासियांची उद्धव ठाकरेंना साथ असल्याचे दिसून आले होते. ही भावनिक लाट लोटवण्यासाठी ठाकरें विरोधात रणनीती आखण्यासाठी राज ठाकरेंच योग्य ठरू शकतात.

4. गुजराती-मराठी वाद, उद्योग धंदे आणि राज ठाकरे

मध्यंतरी राज्यातील अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले. यामुळे राज्यातील भाजप नेत्यांसह केंद्रातील मोदी सरकरावर विरोधकांकडून जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यात राज यांना महायुतीत सोबत सामावून न घेतल्यास जाहीर सभांमधून राज ठाकरे केंद्र सरकारसह राज्य सरकारची लख्तरं काढू शकतं अशी भीती भाजपला आहे. ही नाच्चकी टाळण्यासाठी आणि मराठी विरूद्ध गुजराती असा संघर्ष टाळण्यासाठी राज महायुतीत असणे भाजपसाठी सेफ गेम ठरू शकते.

लेट्सअप विश्लेषण : गडकरी, पंकजांची उमेदवारांच्या यादीत कशी झाली एन्ट्री? ‘हे’ फॅक्टर ठरले कळीचे मुद्दे

5. भाजपच्या हिंदुत्त्वासाठी राज ठरणार ‘गेमचेंजर’ 

राज ठाकरे त्यांच्या अनेक सभांमधून हिंदुत्त्वावर परखड मतं व्यक्त करत आले आहेत. त्यांची भाषण शैली, मुद्दे आणि स्पष्टवक्तेपणा अनेकांना त्यांच्याकडे खेचत असतो. त्यांच्या या शैलीचा आगामी काळात होणाऱ्या सभांमध्ये गर्दी जमवण्यासाठी महायुतीला होऊ शकतो. त्यात नुकतेच अयोध्येत भव्य अशा राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे हिंदुत्त्वाचा अँजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपसाठी राज ठाकरे विजयात गेमचेंजर ठरू शकतात असा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे.

वरील पाच कारणांचा विचार करूनच दिल्ली दरबारी बसलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज यांना दिल्लीत चर्चेसाठी बोलावल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत असून, येत्या काळात खरचं राज यांच्या मनसेचं इंजिन महायुतीत जोडलं जाणार का? आणि जोडलं गेल्यास त्याचा भाजप आणि महायुतीला कितपत फायदा होणार हे निवडणुकांच्या निकालानंतरच पाहणं उचित ठरणार आहे.

follow us