Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांना तिकीट देण्यात आले. या सात उमेदवारांपैकी चार मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित तीन मतदारसंघात अद्याप महायुतीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत त्यामुळे येथील चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजीराव काळगे, कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून गोवाल पाडावी यांना उमेदवार जाहीर झाली आहे.
पुण्यात धंगेकर-मोहोळ टाईट फाईट, वसंत मोरेही मैदानात
राज्यात पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आहे. या मतदारसंघात काँग्रेसने कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात महायुतीचे मुरलीधर मोहोळ रिंगणात आहे. एका अर्थाने दोन्ही पैलवानांनी निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे. दुसरीकडे मनसेला नुकताच जय महाराष्ट्र केलेले फायरब्रँड नेते वसंत मोरे सुद्धा महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. परंतु, आघाडीने धंगेकरांवर विश्वास दाखवला. यानंतर वसंत मोरे अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहे. अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. त्यामुळे आता पुण्यातील निवडणूक त्रिशंकू होणार हे ठरलं आहे.
राज ठाकरेंचा तीन जागांवर दावा, ‘नाशिक’च्या मागणीने भाजप-शिंदे सेनेत अस्वस्थता
नांदेडात चिखलीकरांना वसंतराव चव्हाणांचं आव्हान
नांदेड मतदारसंघात सध्या राजकीय समीकरणे बदलली आहेत. याला कारणीभूत ठरले आहेत भाजप खासदार अशोक चव्हाण. लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण भाजपात आले. त्यांच्या भाजपप्रवेशाने गणिते बदलली आहेत. येथील लढाई काँग्रेससाठी अधिक आव्हानात्मक बनली आहे. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची ओळख अशोक चव्हाणांचे राजकीय विरोधक अशीच आहे. परंतु, बदललेल्या राजकारणात त्यांना अशोक चव्हाणांची साथ मिळणार आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने वसंतराव चव्हाण यांना तिकीट दिले आहे.
वसंतराव चव्हाण आताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत. त्यांचे घराणे शरद पवारांशी एकनिष्ठ होते. राष्ट्रवादीने त्यांना 2009 मध्ये विधानपरिषदेवर नियुक्त केले होते. परंतु, यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे बंडखोरी करून ते विजयी झाले होते. आता त्यांना मविआने लोकसभेसाठी तिकीट दिले आहे. त्यांना आता अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एकत्रित आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
लातुरात काँग्रेसचा नवा चेहरा डॉ. काळगे देणार श्रृंगारेंना टक्कर
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर मतदारसंघातील लढाई टफ आहे. या मतदारसंघात भाजपन सुधाकर श्रृंगारे यांना तर काँग्रेसने शिवाजीराव काळगे यांना तिकीट दिले आहे. सुधाकर श्रृंगारे विद्यमान खासदार आहेत. तरीही ते राजकारणात फारसे चर्चेत नसतात. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरात मोठे प्रकल्प उभारत त्यांनी बांधकाम व्यवसायात नाव कमावले. या काळात त्यांची राजकीय मंडळींशी मैत्री झाली. त्यानंतर 2019 मध्ये तिकीट मिळवून भारतीय जनता पार्टीच्या बळकट संघटनेच्या जोरावर दिल्ली गाठली.
Sharad Pawar : कारवाईचा फायदा केजरीवालांनाच, भाजपच्या ‘त्या’ दोन जागाही येणार नाही; पवारांचा घणाघात
आता याच श्रृंगारे यांच्याविरोधात डॉ. शिवाजीराव काळगे आहेत. स्थानिक उमेदवार, नवा चेहरा आणि कोरी पाटी या काळगे यांच्या जमेच्या बाजू. मतदारसंघातील राजकीय समीकरणे आणि उच्च शिक्षित उमेदवार देत काँग्रेसने तोडीस तोड उमेदवार दिल्याचे सांगितले जात आहे. डॉ. काळगे मतदारसंघात नेत्रतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. देशमुख कुटुंबियांनी या मतदारसंघात लक्ष घातले आहे. त्यामुळे येथील लढत निश्चितच अटीतटीची होईल अशा चर्चा आहेत.
नंदूरबारमध्ये गोवाल पाडवी पराभवाचा वचपा काढणार ?
नंदूरबार मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. डॉ. हिना गावित येथील खासदार. पक्षाने त्यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने माजी मंत्री केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना संधी दिली आहे. त्यामुळे येथील निवडणूक यंदा भाजपसाठी सोपी राहिलेली नाही. नंदूरबारमध्ये आता वकील विरुद्ध डॉक्टर अशी लढत होणार आहे. गोवाल पाडवी वकील आहेत. तर हिना गावित डॉक्टर आहेत. त्यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हिना गावित यांनी केसी पाडवी यांचा पराभव केला होता. तेव्हा यावेळच्या निवडणुकीत गोवाल पाडवी या पराभवाचा वचपा काढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसच्या सात उमेदवारांची यादी
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज-कोल्हापूर
रवींद्र धंगेकर-पुणे
सोलापूर-प्रणिती शिंदे
नंदुरबार-गोवाल पाडवी
अमरावती-बळंवत वानखेडे
लातूर-शिवाजी काळगे
नांदेड-वसंतराव चव्हाण