Mahadev Munde Case Update SIT Chief Pankaj Kumawat : बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे (Mahadev Munde) खूनप्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आलाय. या प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांनी नागरिकांना थेट पुढे येण्याचं आवाहन केलंय. कुमावत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ज्या कोणाकडेही या खुनासंदर्भात (Beed Crime) कोणतीही माहिती असेल, त्यांनी ती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवावी. या उद्देशाने त्यांनी व्हॉट्सॲप नंबरही प्रसिद्ध केला आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल, अशी खात्री देखील देण्यात आलीय. माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
पोलिसांचा तपास घटनास्थळी सुरूच
गेल्या 21 महिन्यांपासून उघडकीस न आलेल्या या खुनाच्या तपासासाठी आता एसआयटीने परळी तालुक्यातील घटनास्थळी थेट पाहणी केली आहे. पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी तहसील कार्यालयासमोरील मैदानावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास भेट दिली. रात्री उशिरापर्यंत, सुमारे साडेतीन तास तेथील परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्यात आला. या पाहणीत कुमावत यांच्यासह तपास पथकातील इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि परळी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी घडलेली घडामोडी, साक्षीदारांच्या शक्यतांचा आढावा आणि परिस्थितीजन्य पुरावे यांचा अभ्यास करत तपासाला आता प्रत्यक्ष दिशा देण्यास सुरुवात झाली आहे.
डंख छोटा धोका मोठा! चीन, अमेरिकेत ‘या’ आजाराचे थैमान; जगभरात 2.4 लाख रुग्ण
दत्तात्रय मुंडेंचा आरोप : जमीन व्यवहारातूनच खून
या प्रकरणातील मृत महादेव मुंडे यांचे वडील दत्तात्रय मुंडे आणि भाऊ अशोक मुंडे यांची देखील एसआयटीने सखोल चौकशी केली. या वेळी दोघांनीही आपल्याकडे असलेली महत्त्वाची माहिती तपास पथकाला दिल्याचे सांगण्यात आले. दत्तात्रय मुंडे यांनी दावा केला की, हा खून 12 गुंठे जमिनीच्या व्यवहारातून झाला आहे. त्यांनी याच कोनातून तपास व्हावा अशी मागणी देखील एसआयटीसमोर केली. अशोक मुंडे यांनीही तपास अधिक खोलात जाऊन करावा आणि आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शेतकऱ्यांनो सावधान! 192 गावांमध्ये लम्पीचा कहर, 888 बाधित जनावरे; 35 मृत्युमुखी
संपर्कासाठी व्हॉट्सऍप नंबर जारी
पंकज कुमावत यांनी या भेटीदरम्यान स्पष्ट शब्दांत सांगितले की, दोषी लवकरच कायद्याच्या कचाट्यात सापडतील. नागरिकांनी सहकार्य करावे, पुराव्यांची माहिती द्यावी आणि या प्रकरणातील सत्य उघड करण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. एसआयटीकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात, माहिती देण्यासाठी खास व्हॉट्सऍप नंबर देखील दिला आहे. ज्यांच्याकडे विश्वासार्ह माहिती आहे, त्यांनी त्वरित संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे. ओळख गोपनीय ठेवली जाणार असून, योग्य माहिती दिल्यास बक्षीस देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.