Kolhapur Assembly Election 2024 : माजी आमदार मालोजीराजे हे २००४ च्या निवडणुकीपूर्वी कोल्हापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकत्र होती आणि कोल्हापूर शहरची जागा काँग्रेसला गेली. (Kolhapur) पण, तगडा उमेदवार नव्हता. त्याचवेळी माजी आमदार मालोजीराजे हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. एका रात्रीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, कै. विलासराव देशमुख आणि अन्य नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला आणि मालोजीराजे काँग्रेसमध्ये आले आणि त्यांच्या गळ्यात उमेदवारीसह आमदारकीच्या विजयाचीही माळ पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मधील. या स्थापनेची बीजे कोल्हापुरात रोवली गेली. कारण ज्यादिवशी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविषयी खासदार शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ उठला होता, त्याचदिवशी शरद पवार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या नागाळा पार्कातील निवासस्थानी नव्या पक्ष स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्यातील कै. खानविलकर यांच्यासह बहुतांश आमदार, खासदार गेले. माजी आमदार मालोजीराजे हे कै. खानविलकर यांचे जावई. त्यामुळे थेट पक्षाच्या कार्यक्रमात नव्हे, पण पक्षासोबत ते असल्यासारखी स्थिती होती.
संजय राऊतांकडून रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी; भाजप आमदार नितेश राणेंकडून जोरदार पलटवार
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर १९९९ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढली. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार होते ॲड. महादेवराव आडगुळे आणि राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले शहराध्यक्ष आर. के. पोवार. याशिवाय शेतकरी कामगार पक्षाकडून कै. विष्णुपंत इंगवले मैदानात होते. विद्यमान आमदार सुरेश साळोखे हे शिवसेनेकडून पुन्हा रिंगणात होते. पण, समविचारी मतांची विभागणी झाली आणि साळोखे यांनी पुन्हा बाजी मारत शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला. २००४ ची निवडणूक जाहीर झाली. १९९९ च्या निवडणुकीतील चुका टाळायचे, असे वरिष्ठ पातळीवर ठरले. त्यातून काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले.
जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. विद्यमान आमदार ज्यांचे त्यांना त्या जागा दिल्या. त्यात कोल्हापूर शहराचा आमदार शिवसेनेचा असल्याने हा मतदार संघ कोणाला जाईल, याविषयी उत्सुकता होती. राष्ट्रवादीने सुरुवातीला याला विरोध केला, त्यामागे काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नसल्याचा दावा होता. त्यातून राष्ट्रवादीकडेच ही जागा राहील आणि मालोजीराजे हेच उमेदवार असतील, असं वाटत होतं. काँग्रेस नेत्यांनी ताकद लावून कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळवली. पण, उमेदवार कोण? हा प्रश्न होताच.
दोन-तीन दिवस खलबते झाली, वरिष्ठ नेत्यांच्या मुंबई, दिल्लीत बैठका झाल्या. त्यात उमेदवार ठरत नव्हता. शेवटी राष्ट्रवादीकडूनच मालोजीराजे यांना काँग्रेसमध्ये पाठवून त्यांनाच उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, कै. विलासराव देशमुख यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी मान्यता दिली आणि अक्षरशः एका रात्रीत मालोजीराजे काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आणि या निवडणुकीत ते विजयीही झाले. दरम्यान, १९८० मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसकडून कै. लालासाहेब यादव विजयी झाले होते. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी ही जागा काँग्रेसने जिंकली, हे त्या निवडणुकीचे विशेष.