Amit Thackeray : समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांचे वाहन काही काळ थांबविण्यात आले. या प्रकारामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड केली. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजपनेही मनसेच्या या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. भाजपा महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अमित ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. टोल फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायला शिका आणि शिकवा असा सल्ला देत आमचं सरकार दादागिरी चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे.
अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा.#Tollnaka #BJPMaharashtra #BJPGovt pic.twitter.com/BBRfDT9rlP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 24, 2023
राज ठाकरे आणि टोलनाका यांचं जुनं नातं महाराष्ट्राला माहिती आहे. त्यात अमित ठाकरे यांची गाडी सिन्नरमधील टोलनाक्यावर तीन ते साडेतीन मिनिटे थांबण्यात आली. फास्टटॅग संबंधी कारणांमुळे गाड्या अडवण्यात येत होत्या. त्यामुळे अमित ठाकरे यांचीही कार थांबवण्यात आली. अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यामुळे मनसे कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली.
यासंबंधी जेव्हा अमित ठाकरेंना समजलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच आसुरी आनंद त्यांना लपवता आला नाही. माध्यमांशी बोलताना त्यांनी खोटं विधान केलं की त्यांना कर्मचाऱ्यांनी टोलनाक्यावर दहा मिनिटे थांबवलं. पण, अमित साहेब तीन मिनिटं थांबवल्यानंतर दहा मिनिटे थांबवल्याचं सांगत कार्यकर्त्यांना टोल पाडण्यास भाग पाडलं, असा आरोप भाजपाने या व्हिडीओद्वारे केला आहे.
“अन् टोल नाका फुटला” : अमित ठाकरेंनी सांगितली मध्यरात्रीच्या खळ्ळखट्याकची हकीकत
कर्तव्य बजावत असताना विचारपूस करणं ही टोलनाका कर्मचाऱ्यांची चूक नक्कीच नव्हती. पण, मनसे कार्यकर्त्यांचा आततायीपणा त्यांनाच भोवला. लक्षात ठेवा, हे सरकार जनसामान्यांचं सरकार आहे. कोणा एकासाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी वेगळे नियम पाळले जाणार नाहीत, असे या व्हिडीओत भाजपने अमित ठाकरे यांना सुनावले आहे. आता भाजपाच्या या व्हिडीओवर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.