मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये (Maharashtra Budget 2023)पर्यावरणावर (Environment)अधिक भर देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प (Budget)सादर केला. त्यामध्ये राज्यातील विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पर्यावरणाला चालना देण्यासाठी विविध घोषणा केल्या आहेत. आजच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 20 हजार ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प (Solar Power Project)उभारले जाणार आहेत. भुसावळ (Bhusaval)येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर केला जाणार आहे.
त्याचबरोबर जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट तयार केला जाणार आहे. अर्थसंकल्पात हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रामध्ये 75 हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर पर्यावरणासाठी हाणीकारक ठरणारी 15 वर्ष जुनी शासकीय वाहनं निष्कासित केली जाणार आहे. त्याचबरोबर 8 ते 15 वर्षांत खासगी वाहनं निष्कासित केल्यास नवीन वाहन खरेदीसाठी कर सवलत दिली जाणार आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळात 5,150 इलेक्ट्रीक बसचा समावेश केला जाणार आहे.
डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित केली जाणार आहेत. यासह पर्यावरण सेवा योजनेचा 7 हजार 500 शाळांमध्ये विस्तार
केला जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे. त्याचवेळी ग्रामीण भागात कडूनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल अशा झाडांची लागवड केली जाणार आहे.
त्याचबरोबर धार्मिक स्थळांच्या परिसरामध्ये देवराई उभारली जाणार आहे. औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी 50 हायटेक रोपवाटिका तयार केल्या जाणार आहेत. यंदा गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी, पक्षी उद्यान सुरु केलं जाणार आहे. त्यासह शिवनेरी (जुन्नर) येथे बिबट सफारी सुरु केली जाणार आहे.