Maharashtra Budget 2025-26 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सोमवार (दि. 10 मार्च)रोजी दुपारी २ वाजता राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मंत्री पवार यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. (Budget) तसंच, काही नव्या धोरणांचीही माहिती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी महायुती सरकार हे पायाभूत सुविधांसाठी येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करणार आहे अशी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-1 ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा-2 अंतर्गत 9 हजार 610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीची कामे मार्च, 2026 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. असही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 अंतर्गत अतिरिक्त 7 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-3 अंतर्गत 1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 3 हजार 582 गावे, 14 हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील असंही ते म्हणाले.
या प्रकल्पाची एकूण किंमत 30 हजार 100 कोटी रूपये आहे. पहिल्या टप्प्यात 8 हजार कोटी रूपये रकमेची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी या 760 किलोमीटर लांबीच्या, 86 हजार 300 कोटी रुपये किंमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. तसंच, सुधारित हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत 6 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांची किंमत 36 हजार 964 कोटी रुपये आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.