Download App

मोदी-सावरकरांसाठी मुख्यमंत्री विरोधकांना भिडले; म्हणाले, पंतप्रधान मोदींचा अपमान..

Eknath Shinde : राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे आजही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक आहेत. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार गदारोळ घातला. यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांना उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्वतः मोर्चा सांभाळला. त्यांनीही संतापाच्या भरात विरोधकांवर जोरदार प्रहार केले.

एरव्ही पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा मुद्दा आला की विरोधकांनवर त्वेषाने तुटून पडणाऱ्या भाजप नेत्यांच्याही पुढे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी किल्ला लढवला. त्यांना ज्या तडफेने विरोधकांवर प्रहार केले त्यातून या दोन्ही नेत्यांचा अपमान शिंदे गटालाही सहन होणार नसल्याचे संकेत दिले.

शिंदे यांनी विरोधकांना उत्तरे देताना सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगितले, की काल घडलेल्य प्रकाराचे आम्ही कदापि समर्थन करत नाही. मात्र, देशाचा मान जगात वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. त्या मोदींचा तुम्ही सातत्याने अपमान करता हे आम्हीच काय देशातील जनता सुद्धा सहन करणार नाही.

वाचा : Shinde-Fadanvis : म्हणून मुख्यमंत्रीपदी मिंधे व उपमुख्यमंत्रीपदी होयबा आणून बसवला, सामनातून टीका

काय म्हणाले तुमचे नेते जरा आठवा. देशात लोकशाही धोक्यात म्हणाले होते. देशात लोकशाही धोक्यातच आली असेल तर भारत जोडो यात्रा कशी काय काढली ? असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर मात्र विरोधकांनी आणखी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनाही यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. नार्वेकर म्हणाले, की मुख्यमंत्री बोलत आहेत आता तरी तुम्ही खाली बसा, तुम्हालाही बोलण्याची संधी दिली जाणार आहे. तरी देखील विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे या गोंधळातच मुख्यमंत्री बोलत राहिले. त्यांच्या रागाचा पाराही वाढतच राहिला.

शिंदे म्हणाले, तुमच्या नेत्यांबाबत आम्ही कधीही अपमानास्पद बोललो नाही. आम्ही नेहमी म्हणतो पंतप्रधान इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधान या देशात होऊन गेल्या. आम्ही त्यांचा मान राखतो. त्यामुळे तुम्हीही आमचे पंतप्रधान मोदींविरुद्ध बोलाल तर अजिबात सहन करणार नाही. तुम्ही बाहेर जाऊन देशाचा अपमान करताल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करताल कोण सहन करणार ? असा सवाल करत प्रत्येकानेच बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे असे शिंदे म्हणाले.

आम्हाला मिंधे म्हणता, चोर-गद्दार म्हणता त्याचे काय ? ; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना सवाल

 नाना त्यावेळी का बोलला नाहीत ?

आमच्या विरोधात मागील आठ महिन्यांपासून काय काय घोषणा दिल्या जात होत्या, ते काय होते. त्यावेळी नाना तुम्ही का काही बोलला नाहीत. ज्या पंतप्रधान मोदींच्या आईचे निधन झाले त्यानंतर अंत्यसंस्कार करून ते कर्तव्यावर हजर झाले. त्यांना तुम्ही चोर म्हणता, देशभक्ती राष्ट्रभक्ती ज्यांच्या नसानसात भरलीय त्यांचा अपमान बिलकुल चालणार नाही, असे शिंदे यांनी सभागृहात रोखठोक सांगितले.

 समान कारवाई करा

आता कारवाई करायचीच असेल तर सर्वांवर समान कारवाई करावी. आठ महिने आमच्या लोकांचा अपमान यांनी केला आहे. त्यामुळे कारवाई करताना या गोष्टीचाही विचार झाला पाहिजे. कारवाई करताना समान कारवाई केली गेली पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Tags

follow us