Download App

सरकार पडणार, असे म्हणणारे नाना सहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जातात तेव्हा….

Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात (Budget Session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार फटकेबाजी केली. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार असल्याच्या ज्या वावड्या विरोधकांकडून उठवल्या जात आहेत. त्याचाही समाचार घेतला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही सरकार पडणार असल्याचे सभागृहातच सांगितले होते. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले.

शिंदे म्हणाले, ‘आरोप करतानाही काहीतरी तारतम्य बाळगले पाहिजे. काही लोक आता सरकार पडणार असे बोलत नाहीत. ते आता मुहूर्त बघत आहेत. नाना पटोले एक दिवस म्हणाले सरकार पडणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आले माझ्याकडे सही घ्यायला. मी म्हणालो, सरकार पडणार तर सही कशाला मागता ?, त्यावर ते म्हणाले अहो ते फक्त बोलायचं असतं. ही त्यांची पद्धत आहे.

सगळ्यांनाच स्वप्न पडत आहे पडू द्या. पण, हे सरकार लोकशाहीतील घटनात्मक सरकार आहे. कायद्याने स्थापित झालेले सरकार आहे. नियमाने स्थापन झालेले सरकार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुद्धा आपल्याला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. बहुमताचे सरकार आहे. त्यानुसार निर्णय होतात. त्यांच्या बाजूने निर्णय झाले तर चांगले आणि आमच्या बाजूने निर्णय घेतले गेले तर काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा : अमित शहा ‘मोगॅम्बो’ नव्हे ‘मिस्टर इंडिया’ शिंदेंनी सांगितला विरोधकांचा ‘कद्रूपणा’

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात शेवटी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले, मुंबईचा विकास गेल्या अडीच वर्षे अहंकारामुळे रखडला होता. आता विकासाचं विमान चांगलंच भरारी घेतं आहे, कारण गतिमान सरकार आलं. काही व्यक्तींच्या अहंकारामुळे बुलेट ट्रेन रखडली, मुंबईचा विकास रखडला होता.

आज आपण मुंबईत विकासाची कामं पाहिली तर मागील ९ महिन्यात आपण म्हणजे या सरकारने एवढे निर्णय घेतले की ते लोकांच्या समोर आहेत. पंचामृत अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. काही लोकांच्या अट्टाहासामुळे रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला आपण गती दिली. आरे कारशेड, मेट्रो ३ हे कुणामुळे थांबले होते ? आपल्याला माहित आहे. मात्र आपलं सरकार आल्यावर आपण लगेचच निर्णय घेतला असे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : आधीचं सरकार सायलेंट आताचे अलर्ट मोडवर! कोकणासाठी केल्या तीन महत्वपूर्ण घोषणा!

ते म्हणाले, शेतकऱ्यांनाही सरकारवर विश्वास आहे. विकासाची संकल्पना घेऊन सरकार पुढे जात आहे. सरकार राज्याच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करत आहे. फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आपण सरकार चालवत नाही. याअगोदरचा काय अनुभव होता ते सगळ्यांना माहित आहे. मुंबईच्या विकासाचं विमान गेल्या अडीच वर्षापासून रखडल आणि अहंकारी धोरणामुळे मुंबईचा विकास झाला नाही असा आरोप त्यांनी केला.

 

Tags

follow us