Download App

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नवखे मंत्री आणि वजनदार खातेही; दिग्गजांना मोठा झटका

अनेकावेळा मंत्री राहिलेल्यांपेक्षा नवख्या मंत्र्यांना मोठे बजेट असलेले खाते मिळालेले आहे.

Maharashtra Portfolio Allocation : महायुती सरकारमध्ये अनेक जण पहिल्यांदाच मंत्री झालेल्यांना वजनदार खाते मिळाले आहे. अनेकावेळा मंत्री राहिलेल्यांपेक्षा नवख्या मंत्र्यांना मोठे बजेट असलेले खाते मिळालेले आहे. मागील सरकारमध्ये महसूलमंत्री असलेले राधाकृष्ण विखे यांना जलसंपदा खाते मिळाले आहे. तेही गोदावरी व कृष्णा खोरे विकास विभागाची जबाबदारी मिळाली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना महसूलमंत्री हे महत्त्वाचे खाते मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी खातेवाटपामध्ये अनेक नव्याना वजनदार खाते दिले आहेत. तर अजित पवार गटाकडे कृषीमंत्री हे महत्त्वाचे खाते आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, ऊर्जा अशी महत्त्वाची खाती आली आहेत. भाजपचे 19 मंत्री आहेत. त्यात शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आले आहे. मागील सरकारमध्ये रवींद्र चव्हाणांकडे हे खाते होते. तर जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते मिळाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही महत्त्वाचे खाते हे साताऱ्या जिल्ह्याच्या आमदारांकडे गेले आहेत.

मोठी बातमी ! मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर, बावनकुळेंकडे महसूल खातं

आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान मंत्री

अशोक उईके यांना आदिवासी विकास खाते मिळाले आहे. तर अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांना कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी हे खातं धनंजय मुंडे यांच्याकडे होतं. भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांना मात्र माहिती आणि तंत्रज्ञान या खात्याचे मंत्री करण्यात आलं आहे. आशिष शेलार यांना मोठं खातं मिळेल असे अपेक्षित होते मात्र त्यांना कमी महत्वाचं खातं देण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

अनुभवी नाईकांना वन खात्याची जबाबदारी

भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक मागील मंत्रिमंडळात नव्हते. आता मात्र त्यांना थेट वनखात्याची जबाबदारी मिळाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट करून हे खातं अनुभवी नेत्याच्या हाती देण्यात आलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांना याआधी मंत्रिपदाचा अनुभव नव्हता. परंतु पक्षाने यंदा त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. नितेश राणेंना मत्स्य आणि बंदरे विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शिंदे गटालाही वजनदार खाती

अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग देण्यात आला आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले यांना रोजगार हमी, प्रताप यांना वाहतूक आणि संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय ही खाती दिली आहेत. मागील सरकारमध्ये शंभूराज देसाई यांच्याकडे उत्पादन शुल्क विभाग होता. या विभागाद्वारे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. आता या खात्याचा कारभार अजित पवार यांना मिळाला आहे.

follow us