Download App

खबरदार! मॅच फिक्सिंग कराल तर होईल पोस्टमॉर्टम ; Nana Patole यांचा इशारा कुणाला ?

Nana Patole News : आगामी काळातील महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असतील या पुन्हा काँग्रेसकडे (Congress) जिंकून आणण्यासाठी एक प्लॅन तयार करण्यात आला आहे आणि त्यात काँग्रेस नक्कीच यशस्वी होईल. जे कुणी मॅच फिक्सिंग करायला निघतील त्यांचे पोस्टमॉर्टम तातडीने केले जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला.

पटोले यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पक्षात गटबाजी करणाऱ्यांबाबतीत पटोले यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. ते पुढे म्हणाले, पक्षापेक्षा कुणीच मोठा नसतो. मी सुद्धा नाही. जर कुणी स्वतःला पक्षापेक्षा मोठा समजत असेल तर त्याला पक्षात अजिबात स्थान नाही ही काँग्रेसची भूमिका आहे.

नाना पटोलेंच्या मनात काय ? ; म्हणाले, राज्यातील घडामोडींसाठी पुढील आठवडा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळल्याच्या मुद्द्यावर पटोले म्हणाले, या बैठकीकडे आमचे लक्ष होते. पुढील आठवडा राज्यातील राजकीय घडामोडींसाठी अतिशय महत्वाचा आहे. पण, सध्या मी यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही असे पटोले यांनी सांगितले.

पुन्हा आले पण, उपमुख्यमंत्री बनले

मी पुन्हा येईन असे म्हणणारे पुन्हा आले पण, उपमुख्यमंत्री बनून आले. माझ्यासारखा कार्यकर्ता असता तर मी आलोच नसतो. भाजप पुन्हा सत्तेत तरी येईल का ते त्यांनी पहावे. ते काय बोलतात, आजकाल काहीच कळत नाही असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

धर्माच्या नावावर कुणी गुंडागर्दी करत असेल तर ते आजिबात मान्य करता येणार नाही. धर्माच्या नावावर आम्ही कधीच राजकारण करत नाही. भाजपकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून ते प्रत्येक निवडणुकीत धर्माचा आधार घेत असतात. पण आता लोक सुद्धा हुशार झाले आहेत, असे पटोले म्हणाले.

Tags

follow us