Maharashtra Cricket Association Election : एकीकडे राज्यात 29 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता राज्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवरुन देखील जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. भारताचा माजी खेळाडू आणि भाजप नेते केदार जाधव यांनी या निवडणुकीवरुन आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहे. न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर केदार जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेत रोहित पवार यांनी स्वत:च्या विजयासाठी नियम धाब्यावर बसवून आपल्या जवळच्या नातेवाईकांना सदस्यत्व दिल्याचा आरोप केदार जाधव यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी कुंती पवार, सतिश पवार, सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही सदस्य करुन घेतल्याचा दावा केदार जाधव यांच्याकडून करण्यात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता रोहित पवार यांनी या प्रकरणात केदार जाधव यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत जोरदार हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, काही लोक क्रिकेटमध्ये राजकारण आणत असून, गरज पडल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा इशारा देत त्यांनी केदार जाधव (Kedar Jadhav) यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, केदार जाधव चांगले फलंदाज आहेत यात शंका नाही, पण सध्या ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून वावरत आहेत. सध्या ते पांढरा शर्ट, खाकी पँट आणि टोपी घालून मैदानात उतरले आहेत, यावरुन त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होते अशी टीका रोहित पवार यांनी केदार जाधव यांच्यावर केली आहे.
तसेच या वादामागे केदार जाधव यांच्या मागे बोलणारा आणि सूत्रे हलवणारा धनी कोणी वेगळाच आहे हा सर्वांना माहित आहे असं देखील रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, ज्या सभासदांनी अधिकृत अर्ज केले होते त्यांनाच प्रक्रियेत स्थान देण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही बेकायदेशीर कृत्य झालेले नाही. न्यायालयात सर्व पुरावे सादर करुन आम्ही आमची बाजू ठामपणे मांडू असं देखील माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले.
