Download App

कर्नाटक-तेलंगाणाने मारली बाजी; दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण, पहा, कितवा आहे नंबर ?

Maharashtra Budget: राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra Economic Survey) आज जाहीर करण्यात आला. या पाहणी अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची (Maharashtra) पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दक्षिणेतील कर्नाटक प्रथम, तेलंगाणा दुसरा, हरियाणा तिसरा त्यानंतर तामिळनाडू राज्याचा चौथा क्रमांक आहे. यानंतर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यावर 4 लाख 71 हजार 642 कोटी रुपयांचे कर्ज (Loan) आहे.

राज्यात महसुली तूट 20 हजार 393 कोटी रुपयांनी वाढली आहे. महसुली जमा चार लाख 3 हजार 423 कोटी रुपये तर महसुली खर्च 4 लाख 27 हजार 780 कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. दरडोई उत्पन्नात राज्याची पाचव्या क्रमांकावर झालेली घसरण मात्र चिंताजनक आहे. महारष्ट्राचे दरडोई उत्पन्न २ लाख १५ हजार २३३ रुपये इतके आहे.

हेही वाचा : Maharashtra Economic Survey 2022-23 : राज्याचा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल सादर; जाणून घ्या यात नेमकं काय?

गुंतवणुकीतही राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात 98151 कोटी रुपये तर कर्नाटक 68931 कोटी रुपयांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 35870 कोटी रुपयांसह महाराष्ट्राचा नंबर आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या रकमेकडे नजर टाकल्यास लक्षात येते की गुजरात महाराष्ट्राच्या बराच पुढे निघून गेला आहे. मागच्या वर्षी औद्योगिक क्षेत्राची वाढ 7.1 टक्के होती. यावेळी मात्र ही वाढ 5.5 टक्के इतकीच आहे.

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो?

मागील 2021 मध्ये महार्ष्ट्रात २ लाख ७३ हजार कोटींची गुंतवणूक आली होती. यावर्षी २०२३ मध्ये ३५८७० कोटी रुपयांची गुंतवणूक येईल, असे अपेक्षित आहे. आठ वर्षात सिंचन क्षेत्रात वाढ फारशी झाली नाही. राज्याची एकूण सिंचन क्षमता 56.24 लाख हेक्टर आहे. प्रत्यक्ष सिंचन केवळ 43.33 लाख हेक्टर इतके झाले आहे. बांधकाम क्षेत्राची वाढ 5.6 टक्के होती. यावर्षी मात्र 5.1 टक्के राहिल असे अपेक्षित आहे. उसाच्या उत्पादनातही यंदा 36 टक्के घट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तृणधान्य 43 तर कडधान्य उत्पादनात 23 टक्क्यांनी वाढ होईल. तेलबियांचे उत्पादन मात्र घटणार आहे. तेलबियांच्या उत्पादनात जवळपास 24 टक्के घट होईल, असा अंदाज या पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

 

Tags

follow us