Sharad Pawar : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आज एक अत्यंत महत्वाची (Sharad Pawar) बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) पक्षाला तुतारी चिन्ह वापरण्यासही मान्यता मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने तुतारी याच चिन्हावर निवडणुका लढल्या होत्या. आता याच चिन्हाचा उपयोग आगामी विधानसभा निवडणुकीत करण्यास मंजुरी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार यांना ही मोठी गुडन्यूज मिळाली आहे.
शरद पवार यांच्या पक्षाला कलम 29 ब नुसार देणग्या देखील स्वीकारता येणार आहेत. देणगी स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकरणी आज निवडणू आयोगासमोर सुनावणी झाली. या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. दिल्लीत आज चार महत्वाच्या सुनावण्या झाल्या. शरद पवार यांचा पक्ष ज्या पद्धतीने हिसकावून घेतला त्याबद्दल धन्यवाद पण जनतेने मात्र आम्हालाच आशीर्वाद दिला. आम्हाला तुतारी चिन्ह तात्पुरतं मिळालं होतं.
चेक स्वीकारण्याचाही अधिकार आम्हाला नव्हता. कोणतीही कर सवलत आम्हाला मिळत नव्हती. मात्र आता आमची विनंती स्वीकारली गेली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. चिन्हात जो गोंधळ निर्माण झाला होता त्याबद्दल दुसरी मागणी होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथं असेल तिथं तुतारी चिन्ह नको. हा अन्याय अन्य पक्षांवरही होऊ नये अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यावर आयोगाने आम्ही अभ्यास करु असे उत्तर दिल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पक्षाला निधी उभारण्यासाठी निवडणूक आयोगाकडे लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याची विनंती केली होती. यावर आज निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली. त्याचवेळी शरद पवार यांच्या पक्षाला अधिकृत मान्यताही मिळाली आहे. या निर्णयानंतर आता पक्षाला कलम 29 बी नुसार देणगी स्वीकारता येणार आहे.
राज्यात काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी शरद पवार यांनी सुरू केली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी त्यांचे दौरे सुरू आहेत. याच वेळी दिलासा देणारा हा निर्णय आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला या निर्णयाचा फायदा नक्कीच होईल असे सांगण्यात येत आहे.