Download App

अजितदादा दिल्लीला गेले पण का? शिंदेंचं टेन्शन वाढणार की आणखी काही..

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी अजितदादा दिल्लीत दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Ajit Pawar in Delhi : राज्यातील जनतेनं महायुतीला कौल दिल्यानंतर आठ दिवस उलटून गेले तरीही अजून मुख्यमंत्री ठरलेला नाही. तरीही येत्या 5 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी निश्चित करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे खातेवाटपावरूनही जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यातच अजित पवार यांनी थेट दिल्ली गाठली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राज्यात असताना अजित पवार दिल्लीला का गेले अशी चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी अजितदादा दिल्लीत दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दिल्लीतील महायुतीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी काय? अमित शाहांनी मागवलं रिपोर्ट कार्ड

राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 41 जागा मिळाल्या. तर शिंदेसेनेने 57 आमदार निवडून आणले. संख्याबळाच्या तुलनेत शिंदे गट वरचढ दिसत असला तरी स्ट्राईक रेटच्या बाबतीत दोन्ही गट समान पातळीवर आहेत. कारण अजित पवार यांच्या पक्षाने शिंदे यांच्या तुलनेत कमी जागा लढवल्या होत्या. त्या तुलनेत जास्त जागा जिंकल्या आहेत. शिंदे गटाने 81 जागांवर उमेदवार देऊन त्यातील 57 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीने 59 जागा लढवून त्यातील 41 जागा जिंकल्या.

या वाढलेल्या स्ट्राईक रेटच्या बळावरच अजित पवार गटाला मंत्रिपदं वाढवून हवी आहेत. यासाठी पक्ष आग्रही असून हीच बाब अमित शाहांना अजित पवार सांगणार आहेत असे समजते. विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. त्यामुळे जास्तीची मंत्रीपदं आम्हाला मिळावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं.

भुजबळ म्हणाले, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत आमची चर्चा झाली की एकनाथ शिंदे यांचे जास्त आमदार निवडून आले तर आपले कमी आमदार निवडून आले आहेत. मात्र स्ट्राईक रेटच्या बाबतीत भाजपनंतर आपला पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे तर शिंदे साहेबांचा गट तीन नंबरवर गेला आहे. तेव्हा त्यांच्या बरोबरीने आम्हालाही मंत्रीपदं मिळावीत अशी मागणी करण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.

Ajit Pawar : शिंदेंची नाराजी अजित पवारांच्या पथ्यावर? अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट

..म्हणून अजित पवार दिल्लीत

दरम्यान, नव्या सरकारचा फॉर्म्यूला समोर येत आहे. यात शिवसेनेला 12 ते 13 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 9 मंत्रिपद मिळू शकतात. परंतु, आता राष्ट्रवादीने स्ट्राईक रेटचा मुद्दा पुढे करत जास्त मंत्रि‍पदांची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बैठकांना गैरहजर राहत आपली बार्गेनिंग पॉवर कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही वेगळं प्लॅनिंग केलं आहे. भाजप कोणत्याही परिस्थिती गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. त्यामुळे कदाचित शिवसेनेकडून अर्थ खातं मागितलं जाऊ शकतं. हीच शक्यता विचारात घेऊन अजित पवार थेट भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

follow us