महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा! मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पारा 38 अंशांपार, कोकणात येलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई आणि सोलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 37 ते 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.

Untitled Design   2026 10 10T100321.886

Untitled Design 2026 10 10T100321.886

Maharashtra hit by the ‘October heat’ : राज्यात यंदा पावसाची तूट जाणवत असतानाच आता ऑक्टोबर हिटने नागरिकांना चांगलाच हैराण केलं आहे. दिवसेंदिवस उभाच चटका वाढत असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागतेय, तर दुपारच्या वेळी उकाड्यामुळे घराबाहेर पडणंही त्रासदायक ठरत आहे. मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर अनेक भागांत कमाल तापमानात वाढ होत असल्याचं चित्र आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई आणि सोलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 37 ते 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे ऐन ऑक्टोबर महिन्यात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे.

कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केल्याची माहिती आहे. या भागांत पुढील काही दिवस उष्णतेसोबतच दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये तापमानाचा पारा 38.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने किनारपट्टी भागात उकाड्याची तीव्रता वाढली आहे.

समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांत दमट हवेमुळे घाम येण्याचं प्रमाण वाढत असून नागरिकांना अधिक अस्वस्थता जाणवत आहे. तापमानातील वाढ आणि हवेतील आर्द्रता यांचा एकत्रित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः दुपारच्या वेळी उन्हात जास्त वेळ राहणं टाळावं, पुरेसं पाणी प्यावं आणि शक्यतो हलके कपडे वापरावेत, असा सल्ला दिला जात आहे. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी उष्णतेपासून बचावासाठी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या मोठ्या नेत्याचा सर्वच पदांचा राजीनामा, भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

एकीकडे उन्हाचा तडाखा आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

या भागांत स्थानिक हवामानातील बदलांमुळे ढगांची निर्मिती होऊन काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, या पावसामुळे राज्यातील सर्वच भागांना उष्णतेपासून दिलासा मिळेल, असं सध्या म्हणता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील भागांत प्रवास करणाऱ्यांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याची खबरदारी घ्यावी.

दरम्यान, बंगालच्या उपसागराच्या दिशेने हवामानातील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. थायलंडच्या किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, या प्रणालीच्या प्रभावामुळे 13 ऑक्टोबरपर्यंत अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संभाव्य हवामान प्रणालीमुळे आगामी काही दिवसांत समुद्रावरील आणि आसपासच्या भागांतील हवामानात बदल होऊ शकतात.

सीजेपीच्या आंदोलनाआधीच राजधानी दिल्लीत हाय अलर्ट, ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् सीमांवर बीएसएफचा वेढा

मात्र, कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानंतर त्याची दिशा, तीव्रता आणि पुढील वाटचाल कशी राहते, यावर त्याचा महाराष्ट्रातील हवामानावर होणारा परिणाम अवलंबून असेल. त्यामुळे राज्यात पावसाचं प्रमाण वाढणार का, याबाबत पुढील हवामान अंदाज महत्त्वाचा ठरणार आहे. राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता असली, तरी उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी आकाश ढगाळ राहू शकतं, मात्र त्यामुळे तापमानात मोठी घट होईलच असं नाही. पावसाची तूट, वाढतं तापमान आणि दमट हवामान यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

एकूणच, महाराष्ट्रात सध्या कुठे ऑक्टोबर हिटचा तडाखा, तर कुठे अवकाळी पावसाची शक्यता, असं संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी तापमान आणि पावसासंदर्भातील हवामान विभागाच्या ताज्या सूचनांकडे लक्ष ठेवावं. उन्हाच्या तीव्रतेच्या काळात अनावश्यक बाहेर जाणं टाळावं आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

Exit mobile version