Lok Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर केला. राज्यात मात्र अजूनही महाविकास आघाडीतील तिढा मिटलेला नाही. वंचित आघाडीला किती जागा द्यायच्या यावरही एकमत झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीने (VBA) ज्या 27 जागांचा प्रस्ताव दिला होता तो महाविकास आघाडीला मान्य नाही. आघाडीने या 27 मधील चार जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव वंचितने फेटाळला आहे. यानंतर आघाडीत मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. कालही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. तसेच वंचित बहुजन आघाडीला कोणताही नवा प्रस्ताव द्यायचा नाही, यावर आघाडीच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकांमूळे गाजराचाही पाऊस पडू शकतो; इंधन दर कपातीवरुन सुळेंची जळजळीत टीका
या बैठकीसाठी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरात, संजय राऊत उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील जागावाटप सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जागावाटपात वंचित बहुजन आघाडीने 27 जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र यातील चार जागा सोडण्याची तयारी मविआच्या नेत्यांनी दाखवली होती. तसा प्रस्तावही दिला होता. या प्रस्तावावर वंचित आघाडीच्या नेत्यांनी विचार करावा असे संजय राऊत म्हणाले होते. मात्र, वंचित आघाडीने हा प्रस्ताव फेटाळला. पराभूत होणाऱ्या जागा आम्हाला दिल्या जात आहेत असे वंचित आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे म्हणाले होते.
Lok Sabha Elections : महायुतीच्या 42 जागांचा तिढा सुटला, केवळ 6 जागांची बोलणी बाकी
यानंतर महाविकास आघाडीने सुधारित प्रस्ताव द्यावा अशी मागणी वंचित आघाडीने केली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल रात्री बैठक झाली. या मुद्द्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यानंतर वंचित आघाडीला कोणताही नवीन प्रस्ताव द्यायचा नाही, यावर नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे. जर खरंच असा काही निर्णय या बैठकीत झाला असेल तर वंचित आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही हा प्रश्न कायम राहत आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला काय ?
महाविकास आघाडीचं जागावाटपाचं चित्र अजून स्पष्ट नाही. तरीदेखील ठाकरे गट 18, काँग्रेस 18, शरद पवार गट 6 आणि वंचित बहुजन आघाडी 4 जागा असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. स्वाभिमानी आणि रासपसाठी 1-1 जागा सोडण्याची तयारी असल्याचेही समजते.