Achalpur Politics : फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…

भारतीय जनता पक्ष हा शिस्तप्रिय मानला जातो. मात्र अलीकडे सत्तेसाठी पक्षाचीध्येय धोरणे सोडून निर्णय घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

  • Written By: Published:
Achalpur Politics : फडणवीस यांनी झापलं...तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं...

BJP-MIM Alliance In Achalpur : ‘राष्ट्रप्रथम’, हिंदुत्व, एकात्म मानववाद आणि सुशासनावर हे शब्द कानावर पडले की, पहिला पक्ष डोळ्यासमोर येतो तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. पण, नुकत्याच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत भाजपनं MIM सोबत हातमिळवणी केली अन् चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे अकोटमधील युतीनंतर फडणवीसांनी अशाप्रकारची युती नको म्हणत कारवाईचा इशारा दिला होता. एवढेच काय तर, स्थानिक भाजपा आमदाराला नोटीसही बजावली होती. मात्र, त्यानंतरही आचलपूरमधील युतीमुळे राष्ट्रप्रथम म्हणवणाऱ्या भाजपात त्यांची ध्येय धोरणे गुंडाळणारी मंडळी तयार होत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. MIM सोबतची युती आणि भाजपचं भवितव्य यावर टाकलेला एक कटाक्ष…

पक्के वैरी बनले सख्खे मित्र! इंदापुरात भरणे अन् पाटलांचं राजकीय मनोमिलन, समर्थकांना रुचणार का?

स्थानिक राजकारणाची गणितं

अचलपूरसारख्या ठिकाणी अनेकदा विचारांपेक्षा जिंकण्याचं गणित जास्त प्रभावी ठरतं. सत्ता मिळवणं, स्थानिक विरोधकांना रोखणं, नगरपालिकेतील किंवा विधानसभा पातळीवरील समीकरणं — यासाठी पक्ष तात्कालिक युती करतात. त्यामुळे अचलपूरमध्ये झालेली युती ही रणनीतिक (strategic) युती आहे, वैचारिक नाही. म्हणजे मोठ्या पातळीवर भाजपची भूमिका बदललेली नाही, फक्त स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला असल्याचे भाजप समर्थकांचे मत आहे. तर, दुसरीकडे या अभद्र युतीवरून राळ उठवणाऱ्या टीकाकारांच्या मते अशा युतीमुळे भाजपचा वैचारिक गोंधळामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. ज्यांच्या विरोधात बोललो, त्यांच्याबरोबर बसायचं कसं?” असा प्रश्न भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

फडणवीसांनी झापल्यानंतरही एमआयएमसोबत हातमिळवणी

भारतीय जनता पक्ष हा शिस्तप्रिय मानला जातो. मात्र अलीकडे सत्तेसाठी पक्षाचीध्येय धोरणे सोडून निर्णय घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्याचे ताजं उदाहरण म्हणजे हिंदू शेरणी अशी ओळख असलेल्या भाजप नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांच्या जिल्ह्यातील अकोटमध्ये भाजपने केलेली MIM सोबत केलेली अभद्र युती. या युतीची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अकोट नगर परिषदेत भाजपनं MIM सोतब युती केली होती. त्यानतंर खुद्द फडणवीसांनी नाराजी व्यक्त करत एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असे फडणवीसांनी सांगितले होते.

लेट्सअप विशेष : भाजपचा मास्टर स्ट्रॅटेजिस्ट! तावडे बिहारप्रमाणे केरळमध्येही तोच करिष्मा दाखवू शकणार?

भाजपच्या विचारधारेला तिलांजली?

मात्र, त्यानंतरदेखील अचलपुरात एमआयएमचा समावेश असलेल्या गटाशी भाजपने संधान साधत सत्तासमीकरण बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चा वाढल्या आहेत. कारण, भाजप नेहमीच राष्ट्रवाद, हिंदुत्व, एकसंध राजकारण यावर भर देतो. तर, त्याउलट MIM मात्र अल्पसंख्याक केंद्रीत राजकारणासाठी ओळखली जाते. त्यामुळे वैचारिकदृष्ट्या दोन्ही पक्ष एकमेकांच्या अगदी विरुद्ध टोकाला असून, एमआयएमसोबतच्या युतीमुळे भाजपची ध्येय धोरणे गुंडाळणारी मंडळी आता पक्षात निर्माण होत आहेत का? आणि विचारधारेलाच तिलांजली देण्याचं काम करत आहेत? असा गंभीर प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

वरील सर्व घडामोडी बघितल्या तर, अचलपूरमध्ये MIM सोबतची युती ही भाजपसाठी राजकीय गरज असू शकते, पण ती वैचारिकदृष्ट्या विसंगत आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळे काहींना वाटतं की ध्येयधोरणं बाजूला ठेवली जात आहेत, तर काहींना वाटतं की हे फक्त प्रॅक्टिकल पॉलिटिक्स आहे. या युतीबाबत तुम्हाला काय वाटतं ही युती “गरज” आहे की “तडजोड”? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

follow us