Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीचे जागावाटप पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या जागावाटपानुसार काँग्रेस पक्ष 17, उद्धव ठाकरे गट 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र या जागावाटपात सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर या तणातणीत काँग्रेस ठाकरे आणि शरद पवार गटासमोर झुकल्याचं स्पष्ट झालं आहे. यातील सांगलीची जागा शिवसेना तर भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार असल्याचे आज स्पष्ट झाले.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघांवरून मोठा तिढा निर्माण झाला होता. सांगलीसाठी ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ सोडायचा नाही असा चंग काँग्रेस नेत्यांनी बांधला. यासाठी आमदार विश्वजीत कदम यांच्यासह सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेते आणि वरिष्ठ नेते कामाला लागले होते. या नेत्यांनी थेट दिल्लीत ठाण मांडले. काहीही करून सांगली परत आपल्याकडे घ्या, अशी विनंती हायकमांडला केली. परंतु, त्यांची विनवणी काही कामी आली नाही.
मोठी बातमी : आंबेडकरांनी मोठा डाव टाकला; ‘मविआ’ शी काडीमोड, लोकसभा स्वतंत्र लढवण्याची घोषणा
ठाकरे गटाने सांगलीवरील दावा शेवटपर्यंत सोडला नाही. उमेदवार घोषित केल्यानंतर अन्य मतदारसंघात जसा आम्ही त्याग केला तसा त्याग काँग्रेसने सांगलीसाठी करावा, अशी तंबीच उद्धव ठाकरे यांनी दिली होती. खासदार संजय राऊत यांनी तर काँग्रेस नेत्यांनी नौटंकी बंद करावी अशा शेलक्या शब्दांत समाचार घेतला होता. यानंतर काँग्रेस नेतेही आक्रमक झाले होते. नाना पटोले, आमदार विश्वजीत कदम यांनी राऊतांवर पलटवार केला होता. तर दुसरीकडे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी फेसबूक पोस्ट आणि पत्रकार परिषदेद्वारे मन मोकळं केलं होतं.
भिवंडीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत घमासान सुरू होतं. या मतदारसंघात राष्ट्रवादीने सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली. यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. काँग्रेस नेत्यांनी बंंडखोरीचे शस्त्र पाजळले. काँग्रेस नेते दयानंद चोरघे यांनी निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी अटळ मानली जात होती.
सांगलीत चंद्रहार पाटीलच मविआचे ‘पैलवान’ : विश्वजित कदम, विशाल पाटलांचे डाव ठाकरेंपुढे फेल
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काय घोषणा होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटप घोषित केले. या नुसार काँग्रेस 17, शिवसेना 21 आणि शरद पवार गट 10 जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या जागावाटपात सांगलीची जागा शिवसेनेच्याच हाती राहिली तर भिवंडीतही शरद पवार गटाने बाजी मारली. जागावाटपाच्या या तहात काँग्रेसचं मात्र ‘पानिपत’ झालं एवढं मात्र नक्की.